नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर केलेल्या आरोपांना प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'शहिदांच्या नावे मतं मागून शहिदांचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांनी आपल्या बेलगाम वक्तव्याने सभ्य, निष्कलंक व्यक्तिमत्वाचा अनादर केला. अमेठीची जनता प्रत्युत्तर देईल, ज्यांच्यासाठी राजीवजींनी हौतात्म्य पत्करलं. मोदीजी, धोकेबाजांना हा देश कधीही माफ करणार नाही', असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'आता लढाई संपली आहे, माझ्या वडिलांवर केलेले आरोपही आता तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. आपले कर्म आपली वाट पाहत आहे. स्वतःच्या मनातल्या गोष्टी माझ्या वडिलांवर थोपवणेही आता आपल्याला थांबवू शकणार नाही, असं ट्विट राहुल गांधींनी केलं.



काय म्हणाले नरेंद्र मोदीं?


माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या रॅलीत गंभीर टीका केली. राहुल गांधी यांना उद्देशून मोदींनी वाक्य उच्चारलं. 'तुमच्या वडिलांना त्यांचे साथीदार मिस्टर क्लिन म्हणत असले तरी त्यांची ओळख भ्रष्टाचारी नंबर १ अशीच होती', अशा शब्दात मोदींनी टीकास्त्र सोडलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी बोफोर्स कथीत गैरव्यवहाराचा उल्लेख करताना हे वक्तव्य केलं. काँग्रेस आणि युपीएला केंद्रात कमकुवत सरकार आणण्यात रस आहे अशी टीका त्यांनी केली.