Lok Sabha Election Result 2024 :   राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था. संघाच्या मुशीत वाढलेला भारतीय जनता पक्ष.. अनेक दशकांपासून भाजपच्या जडणघडणीत, विचारसरणीत संघाची छाप दिसते. भाजपला 2 जागांवरुन सत्तेच्या सिंहासनावर बसवण्यात संघाचा सिंहाचा वाटा राहिलाय. मात्र 2014 मध्ये मोदी अमृतकाळ सुरु झाल्यापासून गेल्या 10 वर्षात संघ आणि भाजपातली दरी वाढत गेली. संघ दक्ष नसल्यानंच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचं 400 पारचं लक्ष्य हुकल्याची चर्चा सुरू झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वबळावर सत्ता मिळत नसल्यानं बहुमतासाठी 10 वर्षांत पहिल्यांदाच भाजपला मित्रपक्षांची गरज पडली आहे. निवडणूक प्रचारात भाजपनं '400 पार'चा नारा दिला होता.  प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागाच मिळाल्या. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 32 जागा कमी पडल्या.  त्यामुळंच तेलगू देसम पक्ष आणि जदयूची मदत घेण्याची वेळ भाजपवर आली. गेले 2 टर्म स्वबळावर बहुमत मिळवणाऱ्या भाजपची 240 जागांवर घसरगुंडी होण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दुरावा हे महत्त्वाचं कारण मानलं जातंय.


दरवेळी निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा थेट सहभाग नसला तरी भाजपच्या बाजूने वातावरण निर्मिती, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यात स्वयंसेवकांचं मोठं योगदान असतंच. मात्र यंदा ते दिसलं नाही.  मुळात यंदा तब्बल पाचव्या टप्प्यातल्या मतदानापर्यंत संघानं निवडणुकीत लक्षच घातलं नाही, ना एकही बैठक घेतली, ना भाजपला काही सुचना केल्या. सुत्रांच्या माहितीनुसार... सहाव्या टप्प्याआधी रा.स्वं. संघाची एक बैठक झाली. निवडणुकीत काम करण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. मात्र याच टप्प्यादरम्यान भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी संघाला उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केलं.


सुरुवातीच्या काळात भाजपच्या विकासासाठी आरएसएसची गरज होती. आता भाजप सक्षम आहे. आता पक्ष स्वतःचं काम स्वबळावर करु शकतो. आरएसएस एक वैचारिक संघटना आणि ते त्यांचं काम करतात, असं वक्तव्य जे. पीड नड्डांनी केलं.
जे.पी नड्डांच्या याच विधानानं संघात पुन्हा नाराजी पसरली. आधीच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या बाहेरच्या नेत्यांना भाजपात घेतल्यानं संघ नाराज होता. महाराष्ट्रातल्या उलथापालथी त्याचं मोठं उदाहरण. त्यामुळं नाराज स्वयंसेवकांनी  निवडणूक प्रचारातून अंग काढून घेतलं. त्याचा परिणाम भाजप आता निकालातून भोगतोय.