Election results 2019 VIDEO : निकालानंतर पंतप्रधान मोदींची आई पुन्हा जनतेसमोर....
आईचं प्रेम शब्दांत व्यक्त करता येणं निव्वळ अशक्य
गांधीनगर : गुरुवारी सकाळी Lok sabha Election results 2019 लोकसभा निवडणुकांसाठी सात टप्प्यांमध्ये पार पडलेल्या मतदानाच्या मतमोजणीची सुरुवात झाली. संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी असणाऱ्या मतमोजणी केंद्रांवर सुरु असणाऱ्या मतमोजणीचे पहिले कल हाती आले आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात जवळपास सत्ता ही भाजपाच्याच हाती जात असल्याचं चित्र अधिक स्पष्ट होऊ लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाच्या पक्षश्रेष्टींकडून याविषयी अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पण, मोदींच्या आईने मात्र माध्यमांसमोर येत साऱ्यांचेच आभार मानले आहेत.
'एएनआय' या वृत्तसंस्थेने याविषयीचा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई, हिराबेन मोदी या त्यांच्या गुजरातमधील गांधीनगर येथील निवासस्थानाबाहेर उभ्या असणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना दोन्ही हात जोडून अभिवादन करत आहेत. या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांच्या कुटुंबातील इतरही सदस्य दिसत आहेत. माध्यमांसमोर सर्वांचेच आभार मानणाऱ्या हिराबेन मोदी यांच्या चेहऱ्यावरील आनंदच सर्वकाही सांगून जात आहे.
दोन्ही हात उंचावून त्या आशीर्वादही हेत असल्याचं प्रतित होत आहे. हे पाहता आपल्या आईला अनन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या पंतप्रधानांच्या डोक्यावर त्यांचाच वरदहस्त असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. मोदींची आई माध्यमांसमोर येतात त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मोदी समर्थकांनी त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात सुरुवात केली. 'हर हर मोदी, नरेंद्र मोदी.....' आणि 'मोदी साहाब आप आगे बढो हम तुम्हारे साथ है', अशा घोषणा देत कार्यकर्ते आणि समर्थकांनी सर्वत्र हा विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.