बहुमताने पुन्हा सत्तेत येणार, भाजपचा दावा
२०१९ मध्ये बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केलाय.
नवी दिल्ली : २०१९ मध्ये बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केलाय. नवी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठकीला सुरुवात झालीय. यावेळी बोलताना अमित शाह यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. भाजपने विजयाचा संकल्प केलाय.
या विजय संकल्पाच्या ताकदीला कुणीच पराभूत करु शकत नसल्याचे शाह यांनी नमूद केलंय. भाजपाची ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २०१९च्या लोकसभा निवडणुकीआधी शेवटची बैठक असण्याची शक्यता आहे. अॅट्रॉसिटी कायद्यावरुन सवर्णांमधील वाढत चाललेला रोष यासह महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्याच्या निवडणुकांसह २०१९च्या निवडणूक रणनितीबाबतही कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला जाणार असल्याचे बोललं जातंय.
भाजप सरकारला घरचा आहेर
केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भाजप सरकारला घरचा आहेर दिलाय. इंधन दरवाढीमुळे लोकांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत असल्यामुळे आता पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणायला पाहिजे, असं मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलंय. इराण, व्हेनेझुएला यांसारख्या तेल उत्पादक देशांनी उत्पादनात वाढ करणार असल्याचे म्हटलं होतं. मात्र, जुलै-ऑगस्ट महिन्याच्या अहवालानुसार, या देशांनी तेल उत्पादनात वाढ केली नसल्याने त्याचा फटका भारतासाऱख्या तेल आयात करणाऱ्या देशांना बसलाय. कारण, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने आंतराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमतीत वाढ झालीय.