संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला 22 वर्षं पूर्ण होत असतानाच बुधवारी दोन तरुणांनी लोकसभेत उड्या मारल्याने एकच खळबळ उडाली. संसदेतील कडक सुरक्षाव्यवस्था भेदत दोन तरुणांनी बुधवारी धुरांच्या नळकांड्यासह लोकसभेच्या प्रेक्षक कक्षेत प्रवेश केला. यानंतर कामकाज सुरु असतानाच त्यांनी सभागृहात उड्या मारल्या. या घटनेनंतर पुन्हा एका संसदेच्या सुरक्षेवर प्रश्चचिन्ह निर्माण होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान लोकसभेच्या सभागृहात उडी मारुन नळकांडे फोडणाऱ्या सागर शर्मा आणि मनोरंजन यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, संसदेच्या आवाराबाहेर धुराची नळकांडी फोडणाऱ्या अमोल शिंदे आणि निलम यांनाही अटक करण्यात आली आहे. तसंच गुरुग्राममधून ललित झा आणि विकी शर्मा यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ऑनलाइन संपर्क साधून संसदेत गोंधळ घालण्याचा कट आखण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. तसंच या तरुणांचा दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. 


सागर शर्माची घुसखोरीआधी पोस्ट


सागर शर्मा याने लोकसभेत घुसण्याआधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. 'आपण जिंकू किंवा हारु, पण प्रयत्न करणं गरजेचं आहे', असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. तसंच दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्याने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते याचा उल्लेख केला होता. 


"जर आयुष्यात काही सुंदर असेल तर ती स्वप्नं आहेत. दिवस-रात्र ते आपल्याला आपण कशासाठी जगत आहोत याची आठवण करुन देतात. स्वप्नांविना आयुष्य अर्थहीन आहे. तसंच आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत न घेणं जास्त उदासीन आहे," असं त्यात लिहिलं होतं.



अटक करण्यात आलेली नीलम 2020 मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाली होती. तीदेखील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सक्रीय होती. नीलमने संसद आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 50 टक्के राखीव कोटा नसल्याप्रकरणी विचारणा केली होती. "महिलांना संसद आणि विधानसभांमध्ये 50 टक्के आरक्षण हवं. हरियाणात ग्रामपंयातीमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. पण संसद आणि विधानसभांमध्ये का नाही?," अशी पोस्ट तिने एक्सवर शेअर केली होती. 


नीलम आणि सागर यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ते भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना फार मानणारे असल्याचं दिसत आहे. दरम्यान पोलिसांनी सहाजणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे.