नवी दिल्ली - एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आम आदमी पक्ष आणि काँग्रेस केवळ भाजपच्या विरोधासाठी एकत्र आले असून, या दोन्ही पक्षांनी दिल्लीतील सात लोकसभा जागावाटपाच्या वाटाघाटी पूर्ण केल्या आहेत. सातपैकी तीन जागा काँग्रेस तर तीन जागा आम आदमी पक्ष लढवणार आहे. उर्वरित एक जागा भाजपचे माजी नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक यशवंत सिन्हा यांच्यासाठी सोडण्यात येईल. सूत्रांनी ही माहिती 'डीएनए' वृत्तपत्राला दिली. सिन्हा हे अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविणार आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्याविरोधात महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रयत्नशील आहेत. याच महाआघाडीचा एक भाग म्हणून दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागांसाठी वाटाघाटी सुरू होत्या. दिल्लीतील लोकसभेच्या सात पैकी तीन जागाच लढविण्याचा पक्षाचा निर्णय न पटल्यामुळे दिल्लीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी गेल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला, अशी माहिती मिळाली आहे. दिल्लीमध्ये १५ वर्षे काँग्रेसची सत्ता होती. पण २०१५ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली विधानसभेतील एकूण ७० पैकी ६७ जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले. तर ३ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत खातेही उघडता आले नव्हते. त्यानंतर दिल्ली काँग्रेसची जबाबदारी अजय माकन यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पक्षाची जनमानसातील प्रतिमा बदलण्यासाठी मोठी मेहनत घेतली. पण आता लोकसभा निवडणुकीत आपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करीत थेट प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, असे समजते. 


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली आणि ईशान्य दिल्ली या मतदारसंघातून आपचे उमेदवार उभे राहतील. तर पश्चिम दिल्ली, वायव्य दिल्ली आणि चांदणी चौक या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार उभे राहतील. 


राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या तीन राज्यांतील लोकसभा निवडणुकीचे जागावाटपही लवकरच निश्चित करण्यात येईल. यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या आघाडीबद्दल काँग्रेसने कोणतीही माहिती दिलेली नाही. अर्थात आघाडीबद्दल काँग्रेसचे कार्यकर्ते उत्साही नाहीत. त्यांच्यामध्ये नाराजी असल्याचे एका नेत्यांने स्पष्ट केले.