राहुल गांधी यांची `ही` मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळली
लोकसभेत मोदी सरकावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. राफेल विमान खरेदीवरुन काँग्रेसने रान उठवले आहे.
नवी दिल्ली : लोकसभेत मोदी सरकावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. राफेल विमान खरेदीवरुन काँग्रेसने रान उठवले आहे. काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी या प्रश्नावरुन मोदी सरकारला घेरलेय. राफेल प्रकरणी संपूर्ण देश पंतप्रधानांना थेट प्रश्न विचारत आहे. पण एकाही प्रश्नाचे उत्तर देण्याची हिंमत पंतप्रधानांकडे नाही, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. राफेलमध्ये गडबड आहे. याचा आपल्याकडे पुरावा आहे. त्याची ऑडिओ क्लिप आपल्याकडे आहे. ही क्लिप प्ले करण्याची परवानगी राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे मागतली. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली.
ऑडिओ क्लिप मीडियासमोर सादर
राफेल विमानांच्या १६०० कोटींच्या किंमतीला संरक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांनी हरकत घेतल्याची बाब सांगितली जात आहे, ती असत्य आहे असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. तत्कालीन संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप आपल्याकडे आहे. याप्रकरणी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा रेकॉर्डेड फोनो क्लिप प्ले करण्याची परवानगी राहुल गांधी यांनी मागितली. ती लोकसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजीतवाला यांनी ही क्लिप मीडियासमोर ऐकवली.
काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये?
राफेल विषयावरून देशभर चाललेल्या गोंधळात काँग्रेसने आणखी एक नवा वाद तयार केला आहे. राफेल विषयी काँग्रेस माझे काही करू शकत नाही. कारण, सर्व फाईल माझ्या बेडरूम मध्ये आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपल्याला दिली असल्याची कबुली गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे देत आहेत, अशा स्वरूपाची क्लिप काँग्रेसने दिल्लीत माध्यमांसमोर दाखविली आहे. याबाबत विश्वजित राणे यांनी आज प्रेस घेत ही ऑडिओ क्लिप माझी नसून काँग्रेस देशाच्या सुरक्षेविषयी किती घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.
विश्वजीत राणेंची चौकशीची मागणी
यासर्व प्रकारची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी राणे यांनी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री पर्रिकर, पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी बोललो असून त्यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे, अशी माहिती राणे यांनी दिली. दरम्यान, या कथित ऑडिओ क्लिपनंतर राजकीय वातावरण अधिक तापलेय.