दिल्लीत अमित शाह आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा, मनसेला `इतक्या` जागा मिळण्याची शक्यता
Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात दिल्लीत अर्धा तास बैठक झाली. या बैठकीत मनसे एनडीएमध्ये सहभागी होण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. लोकसभेसाठी मनसेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
Loksabha 2024 : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. आणि त्याचं केंद्रबिंदू ठरलंय राजधानी दिल्ली. दिल्लीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अमित शाहांची (Amit Shah) बैठक घेतली.. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये बैठक झाली.. मनसे महायुतीत (Mahayuti) सामील होणार हे जवळपास निश्चित झालं असून अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. महायुतीकडून लोकसभेसाठी मनसेला (MNS) एक जागा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेनेला (Shivsena Shinde Group) लोकसभेच्या जेवढ्या जागा मिळतील त्यातील एक जागा मनसेला देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे दिल्लीत आहेत...दिल्लीत झालेल्या वाटाघाटींमध्ये राज ठाकरेंना महायुतीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हं आहेत. मनसेला कोणती जागा देणार याबाबत सस्पेंस कायम आहे. मात्र, दक्षिण मुंबईची जागा मनसेला सुटण्याची दाट शक्यता आहे.
राज ठाकरे मराठी माणसाच्या हिताचा, हिंदुत्वाचा आणि पक्ष हिताचा निर्णय घेतील असं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी म्हटलंय. बाळा नांदगावकर दिल्लीत खासदार म्हणून गेले तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया देत मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचे संकेत देशपांडेंनी दिलेयत.
राज ठाकरे एनडीएत सहभागी होणार?
राज ठाकरे एनडीएत सहभागी होणार असल्याच्या चर्चेनंतर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्यायत...शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याची टीका राऊतांनी केलीय...तर मनसे इंडिया आघाडीत आली तर मानसन्मान होईल असं सुळेंनी म्हटलंय...तर राज ठाकरे युतीत आल्यावर शक्ती वाढेल अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिलीय..
महायुतीत घडमोडींना वेग
तर इथे मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सागर बंगल्यावर बैठक पार पडली. बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलारही उपस्थित होते. तर ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंचे शिलेदार त्यांच्या भेटीला पोहोचले होते. खासदार भावना गवळी, राहुल शेवाळे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी उपस्थित होते.
माढाचा तिढा सुटणार?
माढा लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीत सुरु असलेला तिढा मिटण्याची शक्यता आहे. कारण रामराजे नाईक निंबाळकर, रणजितसिंह निंबाळकर यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर रामराजे नाईक निंबाळकरांना सोडण्यासाठी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर बाहेर आले होते. त्यामुळे दोघांमधील वाद मिटल्याचे संकेत मिळतायत.. माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं विजयसिंह मोहिते-पाटील आणि रामराजे निंबाळकरांनी नाराज झाले, त्यांनी उघडपणे रणजितसिंहांना विरोध केला. त्यानंतर गिरीश महाजनांनी मोहितेपाटलांची भेट घेतली. त्यानंतर आता रामराजे निंबाळकर-रणजितसिंह निंबाळकर यांच्यात फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.