Maharashtra Politics : निवडणुकीत एका पक्षाला एकच चिन्ह असतं पण भारतीय जनता पक्ष (BJP) दोन चिन्हांवर लढत आहे, एक चिन्ह कमळ आहे तर दुसरं चिन्ह वॉशिंग मशिन आहे. आणखी दोन फ्रंटल आहेत ते म्हणजे ईडी (ED) आणि सीबीआय (CBI). भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची निती व नियत ही समाजात फूट पाडण्याची आहे. भाजपाच्या या नितीविरोधात काँग्रेस (Congress) पक्ष मात्र भारत जोडो आणि न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyay Yatra) माध्यमातून समाजाला न्याय देण्याचे काम करत आहे, असं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश  (Jayram Ramesh) यांनी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदूरबार इथं पत्रकार परिषदेत बोलताना जयराम रमेश यांनी भारत जोडो न्याय यात्रेची माहिती दिली. 14 जानेवारी 2024  ला मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरु झाली. आज 59 व्या दिवशी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा आणि पांच न्याय याबद्दल जनतेला माहिती दिली. आतापर्यत तीन न्याय संदर्भात काँग्रेस पक्षांने गॅरंटी दिली आहे. ही गॅरंटी एका व्यक्तीची नाही तर ही पक्षाची गॅरंटी आहे. एमएसपीला कायदेशीर करणे, तरुणांना पाच न्याय देण्यासंदर्भात गॅरंटी दिली तर सामाजिक न्याय संदर्भात जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची 50 टक्के मर्यादा हटवण्याची गॅरंटी दिली आहे. धुळ्यात महिला संमेलनात महिला न्याय संदर्भातील गॅरंटी जाहीर केली जाईल तर 17 तारखेला शिवाजी पार्कवरील सभेत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कामगार न्यायाच्या गॅरंटीबद्दल घोषणा केली जाईल.


जागावाटपाची चर्चा सुरु
प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरु आहे, सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय आहे. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा असून कोणतेही मतभेद नाहीत. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरु आहे. बाळासाहेब थोरात हेही त्यांच्याशी चर्चा करत आहेत. 17 तारखेनंतर मविआचा जागा वाटपाचा फार्म्युला जाहीर केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


'देश महागाई आणि बेरोजगारीच्या खाईत'
देशाची अवस्था अत्यंत वाईट असून लोकशाही व संविधान संपवून जनतेला महागाई व बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे. शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्यात आले आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. देशाला दिशा दाखवण्याचे काम महाराष्ट्राने केलं आहे यावेळीही महाराष्ट्रच परिवर्तनाचा संदेश देणार आहे. भाजपा लोकसभेच्या 150 जागाही निवडून येणार नाहीत. भाजपाचा शेवटचा प्रयत्न सुरु आहे. केंद्रातील भाजपा सरकार खाली खेचण्याची भावना जनतेची झालेली आहे. 


यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, नंदूरबार जिल्हा नेहमीच काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जिल्हा राहिला आहे. आणि या जिल्ह्यातून काँग्रेसचे उमेदवार नेहमी निवडून आला आहे. भाजपाच्या कार्यपद्धती व विचाराविरुद्ध आहेत. जे या विरोधात आहे त्या सर्वांनी एकत्र यावे ही भूमिका काँग्रेसची आहे. या विचाराचे लोक भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होत आहेत. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान 14 मार्चला चांदवड इथं शेतकरी मेळावा होत असून मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उपस्थित राहणार आहेत.