Ayodhya Ground Zero Report : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वच ठिकाणी हार-पराभवाची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election Result) चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपाला (BJP) 240 जागांवर समाधान मानावं लागलं. काही हक्क्काच्या जागा भाजपाला गमवाव्या लागल्या. यात सर्वात अनपेक्षित निकाल होता तो अयोध्येचा. अयोध्येत (Ayodhya) भाजप उमेदवाराला पराभावाचा सामना करावा लागला. अयोध्या म्हणजे फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अवधेस प्रसाद जिंकून आले. अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आलं. आचारसंहित लागण्यापूर्वी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करुन सर्वसामन्यांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं. इतंकच काय तर विमानतळ बनवण्यात आलं. आंतराष्ट्रीय दर्जाच्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली. रामपथ तयार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत राम मंदिराची हवा तयार करण्यात आली. पण यानंतरही अयोध्यात भाजपाला पराभवाचा धक्का बसला. संपूर्ण देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येत भाजपाच्या पराभवाचं कारण
भाजपकडून लल्लू सिंह यांना दुसऱ्यांदा उमेदवाराी देण्यात आली होती. 2019 लोकसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर लल्लू सिंह यांनी तुम्ही पीएम मोदी यांना मतं दिलीत, मला नाही अशी उत्तरं द्यायला सुरुवात केली. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी पसरली. याशिवाय राममंदिर उभारणीनंतर त्या भागात राम पथची निर्मिती करण्यात आली. यासाठी हजारो दुकानं आणि घरं जमीनदोस्त करण्यात आली. याबदल्यात त्यांना मिळालेला मोबदला फारच अत्यल्प होता. याची तक्रार घेऊन तिथले नागरिक लल्लू सिंह यांच्याकडे जायची, त्यावेळी हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याचं उत्तर दिलं जात होतं. 


उत्तर प्रदेशची राजकीय परिस्थिती जाती आणि धर्माच्या अवतीभोवती फिरणारी आहे. या निवडणुकीतही जातीवादाचा प्रश्न मुख्य राहिला. यापुढे राम मंदिर, विकास, महागाई हे मुद्दे दुय्यम ठरले अशी इथल्या लोकांची प्रतिक्रिया आहे. लल्लू सिंह जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले,  दुकानं, घरं तोडण्यात आली यामुळे जनतेत नाराजीचं वातावरण होतं. तिच भाजप उमेदवाराला भोवली.


याशिवाय बाबा का बुलडोझर, शेतकरी आंदोलन, जीएसटी, अग्निवीर योजना याबाबतही उत्तर प्रदेशमधल्या नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. अयोध्यते राम मंदिर बनलं, विकास झाला पण राम पथसाठी ज्या गरीबांची घरं तोडण्यात आली त्यांना योग्य मोबदला देण्यात आला नाही. दुकानदारांना तर काठ्यांनी मारून हकलण्यात आल्याचं तिथल्या लोकांनी सांगितलं.