शिमला :  लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात हिमाचल प्रदेश येथील एका मतदान केंद्रावरुन अविश्वसनीय माहिती समोर आली आहे. रविवारी पार पडलेल्या मतनोंदणी प्रक्रियेत हिमाचल प्रदेश येते असणाऱ्या ताशिगांग या गावात जवळपास १४२ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. मतदानाचा हा आकडा सध्या अनेकांनाच थक्क करत आहे. मुख्य म्हणजे विक्रमी मतदानाच्या या आकड्याअंतर्गत करण्यात आलेली सर्व मतं ही वैध ठरवण्यात आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेश येथे असणाऱ्या 'का' या सर्वाधिक लहान मतदान केंद्रावर ८१.२५ टक्के इतकं मतदान झालं. त्या ठिकाणी एकूण १३ मतदारांच्या नावांचा मतदार यादीत समावेश आहे. काझा येथील एसडीएम जीवन नेगी यांनी याविषयीची माहिती दिली. ताशिगांगच्या मतदार यादीत उल्लेख असल्यानुसार येथे ४९ मतदारांच्या नावांची नोंदणी असून, एकूण ७० मतदारांनी गावातील मतदान केंद्रात मत नोंदवलं. मतदानात झालेली ही लक्षणी वाढ पाहता ताशिगांग आणि परिसरात असणाऱ्या मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनाही सर्वाधिक दहा हजार फूटांहून अधिक उंचीवर असणाऱ्या मतदान केंद्रात जाऊन मत देण्याची इच्छा झाली. 


ताशिगांग गावातील ४९ नोंदणीकृत मतदारांपैकी ३६ गावकऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्यामध्ये २१ पुरूष आणि १५ महिलांचा समावेश आहे. शिवाय निवडणूक अधिकाऱ्यांनीही आयोगाकडून त्यांना देण्यात आलेले इलेक्शन ड्युटी सर्टीफिकेट दाखवून ताशिगांग मतदान केंद्रात मतदान केलं. 



हिमालच प्रदेशातील स्पिती व्हॅली येथे असणाऱ्या या गावात सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. तापमानाचा पारा बराच खाली गेलेला असतानाही त्या ठिकाणी पाहायला मिळालेला मतदानाचा आकडा मात्र लोकशाही राष्ट्रासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बाब ठरत आहे, हे खरं. ताशिगांग आणि 'का' ही दोन्ही मतदान केंद्र मंडी या मतदार संघात येतात. येथे भाजपचे राम स्वरुप शर्मा आणि काँग्रेसचे आश्रय शर्मा यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे.