नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची जिंकण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाची जागृकता करणारे ट्वीट केले आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना देखील त्यांनी यामध्ये टॅग केले आहे. ममता बॅनर्जी, राहुल गांधी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांना पंतप्रधानांनी टॅग केले आहे. पण जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोदींना टोला लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणूक 2019 ची घोषणा झाली आहे. संपूर्ण देशात 17 व्या लोकसभेसाठी 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत खासदारकीचे मतदान असणार आहे. त्यानंतर 23 मे ला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहीत केले आहे. यावेळी विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसहीत काही राज्यांचे मुख्यमंत्री, खेळाडू, अभिनेते आणि उद्योग जगतातील महत्त्वाच्या व्यक्तींना ट्विटमध्ये टॅग केले आहे. यासोबत पंतप्रधान मोदींनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात त्यांनी एक ब्लॉग देखील लिहीला आहे. ज्यामध्ये त्यांनी मतदान ओळखपत्र आणि मतदानासंबंधीची महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. 



मतदानाबद्ल जागृतता आणण्यासाठी पंतप्रधान प्रसिद्ध चेहऱ्यांची मदत घेत आहेत.अखिलेश यादव यांनी मोदींचे हे ट्वीट रिट्विट केले. पंतप्रधान मोदी मतदानाचे आवाहन करत असल्याचा आनंद आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करा आणि नवा पंतप्रधान निवडणून आणा असे ट्विट अखिलेश यांनी केले. 



पंतप्रधान मोदी यांनी दीपिका पादुकोण, आलिया भट्ट यांच्या सहित अनेक सेलिब्रेटींना टॅग करून हे ट्वीट केले आहे. 




ओमर अब्दुल्ला यांनी देखील पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. प्रसिद्ध व्यक्तींना टॅग करुन मतदानाचे आवाहन करणे योग्य आहे. पण जम्मू काश्मीरच्या विधानसभा लांबणीवर टाकून आमचे हक्क जाणीवपूर्वक मारल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकी सोबतच जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होतील असे वाटत होते. पण सुरक्षेचे कारण देत ही निवडणूक लांबणीवर गेली आहे.