Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यानं 20 मे 2024 रोजी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. भारतीय नागरिकत्वं मिळाल्यानंतर खिलाडी कुमारनं मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर त्यानं नागरिकांनाही मोठ्या संख्येनं मतदान करण्यातं आवाहन केलं. 


मतदानानंतर काय होती अक्षय कुमारची प्रतिक्रिया? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझा देश विकसित आणि सक्षम असावा असंच मला वाटतं आणि त्याच हेतूनं मी हे मतदान केलं आहे. भारतानं, भारतीय नागरिकानं त्यांना जे योग्य वाटत आहे त्यासाठी मतदान करावं', असं अक्षय कुमार म्हणाला. मतदान केंद्रांवर दिसणारी गर्दी पाहता मतदानाचा आकडा चांगला असेल असा विश्वासही त्यानं व्यक्त केला. 



साधारण वर्षभरापूर्वीच अक्षय कुमारला भारताचं नागरिकत्वं मिळालं होतं. याआधी त्याच्याकडे कॅनडाची नागरिकता असल्यामुळं तो भारतात मतदान करण्यास पात्र नव्हता. पण, आता मात्र अधिकृतरित्या भारताचं नागरिकत्वं मिळाल्यामुळं खिलाडी कुमारनं मतदानाचा हक्क बजावत आनंद व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. त्यानं नागरिकत्वाचं प्रमाणपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणत 'हृदय आणि नागरिकत्वं दोन्ही भारतीय' असं लिहिलं होतं. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : वादळाचं सावट; 40-50 प्रतितास वेगानं वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार


 


पाचव्या टप्प्यातील मतदानाची धामधूम 


लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील 49 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. या पाचव्या टप्प्यामध्ये बिहार, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल आणि त्यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे अशा दिवसांना अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं.