`एका व्यक्तीची इच्छा..`; संविधान बदलण्यासाठी `रामायण` फेम गोवील यांचा पाठिंबा?
Arun Govil On Constitution Change: यापूर्वी भाजपाच्या एका उमेदवाराने, `सरकार स्थापन करण्यासाठी 272 खासदार पुरेसे आहेत. मात्र संविधानामध्ये बदल करायचा असेल किंवा नवीन तयार करायचं असेल तर आपल्याला दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमतं मिळालं पाहिजे,` असं म्हटलं होतं.
Arun Govil On Constitution Change: मध्य प्रदेशमधील फैजाबादमधील विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार लालू सिंह यांनी भारतीय संविधानात बदल करण्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. असं असतानाच आता भाजपाचे मेरठ मतदारसंघातील उमेदवार आणि रामायण मालिकेमुळे घराघरात पोहचलेले ज्येष्ठ अभिनेते अरुण गोवील यांच्या विधानामुळे या वादात पुन्हा नव्याने भर पडल्याचं दिसत आहे. सोमवारी एका ठिकाणी बोलताना, संविधानामधील बदल हे प्रगतीचं प्रतिक असून त्यामध्ये वाईट काहीच नसल्याचं गोवील म्हणाले आहेत.
अरुण गोवील नेमकं काय म्हणाले?
"संविधान बनवण्यात आलं होतं तेव्हा काळानुरुप त्यात बदल करण्यात आला. सतत होणारा बदल हे प्रगतीचं द्योतक असतात. बदल होणे काही वाईट गोष्ट नाही. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे. सर्वांची सहमती असेल तरच घटनात्मक बदल केला जातो. एका व्यक्तीची इच्छा असेल तर संविधानात बदल करता येत नाही," असं गोवील यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करता म्हटलं.
अखिलेश यांनी साधला निशाणा
गोवील यांच्या या विधानानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या एक्स अकाऊंटवरुन अखिलेश यांनी, "संविधानामध्ये सुधारणात्मक बदल करणे आणि मूलभूत बदल करणे या दोन्ही गोष्टींमध्ये फरक न कळणाऱ्या व्यक्तीला तिकीट देऊन भाजपाने मोठी चूक केली आहे. मात्र याचा फारसा परिणाम होणार नाही कारण लोकांनी यंदा भाजपाच्या प्रत्येक उमेदवाराला पराभूत करण्याचं ठरवलं आहे," असं म्हणालं आहे.
सरकार निवडून येण्यासाठी 272 खासदार पुरेसे पण...
गोवील यांच्याआधी फैजाबादमधील भाजपाचे उमेदवार लालू सिंह यांनी संविधानासंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला होता. आम्हाला दोन तृतीयांश मताधिक्य मिळाल्यास आम्ही संविधानामध्ये बदल करु किंवा नवीन संविधान बनवू अशा अर्थाचं विधान केलं होतं. "सरकार स्थापन करण्यासाठी 272 खासदार पुरेसे आहेत. मात्र संविधानामध्ये बदल करायचा असेल किंवा नवीन तयार करायचं असेल तर आपल्याला दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमतं मिळालं पाहिजे," असं लालू सिंह कुंदरखा कालन गावामधील चौपालदरम्यान म्हणाले होते.
लालू सिंह यांना नंतर त्यांच्या विधानासंदर्भात विचारण्यात आलं असता, "यात वादासारखं काय आहे? वेळोवेळी जेव्हा गरज पडली तेव्हा संविधानामध्ये बदल करण्यात आला आहे," अशी प्रतिक्रिया नोंदवली.