मोदींनीच पोस्ट केला स्वत:चा नाचतानाचा Video! पोलिसांचं टेन्शन का वाढलं?
PM Modi Shared Own Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांच्या गडबडीदरम्यान शेअर केलेला स्वत:वरील हा मजेदार व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत असून तो प्रचंड व्हायरल झाल्याचं दिसत आहे.
PM Modi Shared Own Viral Video: लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर मिम्सचे अनेक व्हिडीओ शेअर होत आहेत. मागील 24 तासांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मतता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भातील व्हिडीओ मिम्स व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे. आधी ममता बॅनर्जींचा एक एडिटेड व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर कोलकाता पोलिसांच्या सायबर गुन्हेगारी विभागाच्या 'एक्स' (आधीच्या ट्वीटर) हॅण्डलवरुन हा व्हिडीओ हटवण्याचे निर्देश दिले.
पोलिसांनी पाठवली नोटीस
कोलकाता पोलीस इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी या एक्स हॅण्डल युजरला नोटीसही पाठवली आहे. या युझरवर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. मात्र हा सारा गोंधळ सुरु असतानाच पंतप्रधान मोदींचा अशाच प्रकारे एडीट करण्यात आलेला मिम व्हिडीओ त्यांनीच शेअर केला आहे. यामुळे आता अनेकांनी मतता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे.
ममतांच्या मिम व्हिडीओमध्ये काय?
सोशल मीडियावर कोलकाता पोलीस हा टॉप ट्रेण्ड होताना दिसत आहे. एका मीममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्टेजवर येऊन नाचता दाखवण्यात आल्या आहेत. यावर डीसीपी (सायबर क्राइम) कोलकाता या एक्स हॅम्डलवरुन रिप्लाय करताना, तुम्ही तुमचं खरं नाव आणि पत्ता सांगावा अशी मागणी हे मिम पोस्ट करणाऱ्याकडे केली. तसेच माहिती दिली नाही तर तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असं ही कोलकाता पोलिसांनी सांगितलं.
मोदींनी शेअर केला स्वत:चाच मजेदार व्हिडीओ
कोलकाता पोलीस या नको त्या वादामुळे चर्चेत असताना लोकांनी ममतांप्रमाणे मोदींचेही असेच मिम व्हिडीओ तयार करुन व्हायरल केले. विशेष म्हणजे एकीकडे ममता बॅनर्जींविरोधातील मिम व्हिडीओवरुन पोलीसांनी कारवाई सुरु केली असतानाच दुसरीकडे मोदींनी त्यांच्यावरील मिम स्वत: कोट करुन रिट्विट करत शेअर केलं आहे. "तुम्हा सर्वांप्रमाणे मी सुद्धा स्वत:ला असं नाचताना पाहण्याचा आनंद लुटला. निवडणुकीच्या काळात ही असली क्रिएटीव्हिटी शिगेला पोहचलेली असते आणि हे पहाणे खरोखर आनंददायी आहे," असं म्हणत मोदींनी स्वत:चा डान्स करतानाचं मिम शेअर केलं. या पोस्टला त्यांनी #PollHumour हा हॅशटॅग दिला आहे.
माजी पोलीस अधिकाऱ्यांनी सुनावलं
यानंतर अनेक माजी पोलीस अधिकाऱ्यांनी कोलकाता पोलिसांना लक्ष्य केलं आहे. जम्मू-काश्मीरचे माजी डीजीपी शेष पाल वैद यांनी, कोलकाता पोलिसांनी पोलीस म्हणून काहीतरी खरं वाटणारा काम करण्याची वेळ आली आहे. असा टोला लगावला. मीम्स पोस्ट करणाऱ्या पॅरडी अकाऊंटला धमकावण्याऐवजी रामनवमी, हनुमान जयंतीच्या मिरवणुकींदरम्यान झालेला हिंसाचार आणि संदेशखालीच्या आरोपींना अटक करण्यावर बंगाल पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केलं पाहिजे. सध्या जे काही सुरु आहे ते पोलिसांच्या प्रतिमेबद्दल चांगला संदेश देणार नक्कीच नाही, असं वैद म्हणाले आहेत.
तामिळनाडू पोलिसांची मदत घ्या
तामिळनाडूचे भाजपाध्यक्ष के. अन्नमलाई सुद्धा आयपीएल अधिकारी होते. त्यांनी मोदींचं डान्स करणारं मिम शेअर करताना, "कोलकाता पोलीस तुमच्यासाठी. तुम्हाला कलमं लावण्यासंदर्भात काही अडचण असेल तर तामिळनाडू पोलिसांची मदत घ्या," असा खोचक टोला लगावला आहे.