रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: (Loksabha election Rahul Gandhiलोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या गटात तातडीनं हालचाली करत सत्तास्थापनेसाठीची समीकरणं ठरवण्यात आली. भाजपप्रणित एनडीएच्या वतीनं लगेचच नरेंद्र मोदी यांना युतीच्या नेतेपदी निवडत त्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करणारा प्रस्ताव सादर करण्यात आल्या. बहुमताचा आकडा भाजपला एकहाती गाठता आला नाही, पण जेटीयू आणि टीडीपीच्या महत्त्वपूर्ण साथीनं हे अग्निदिव्यही ओलांडलं गेलं आणि परिणामी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यास सिद्ध झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथं मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असतानाच तिथं राहुल गांधी यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. मंत्रीमंडळात स्थान नसलं तरीही राहुल गांधी यांना सत्ताधाऱ्यांपुढं खंबीरपणे उभं करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं विरोधी पक्षनेता केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक घेण्यता येणार आहे. याच बैठकीदरम्यान विरोधी पक्षनेतेपदावर निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस नेते आणि नवनिर्वाचित खासदारांची या बैठकीला उपस्थिती असणार आहे. या बैठकीला काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यांसह सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष, संसदीय पक्षाचे नेते आणि सर्व महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळं आता काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत कोणकोणते ठराव पास केले जातात याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 


हेसुद्धा वाचा : चंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबाला 8700000000 रुपयांची लॉटरी, पत्नी मालामाल; पाच दिवसांत कशी वाढली इतकी संपत्ती? 


इंडिया आघाडीमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाच्या असून, त्यामुळं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे राहणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपद कोणाला देण्यात यावं याविषयी चर्चा झाली असून, प्राथमिक स्तरावर हे पद राहुल गांधी यांच्याच वाट्याला जावं अशी मागणी समोर येत आहे. त्यासंदर्भात आता दिल्लीमध्ये बैठकीत कोणता अंतिम निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. 


विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचं का? 


विरोधी पक्षनेतेपदही अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. तज्ज्ञांच्या मते या पदालाही मंत्रीपदाइतका दर्जा असतो. अनेकदा या विरोधी पक्षनेत्याची ओळख भावी पंतप्रधान म्हणूनही असते. त्यामुळं राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदी आल्यास 234 जागा मिळवणाऱ्या इंडिया आघाडीची ताकद नक्कीच वाढेल यात शंका नाही.