`पती मोदी-मोदी करत असेल तर जेवायला देऊ नका`; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला
CM Arvind Kejriwal : दिल्लीत आपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महिला मतदारांना अजब सल्ला देऊन भाजपला मतदान करु नका असे सांगितले आहे.
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचे बिगुल काही दिवसांमध्येच वाजण्याची शक्यता आहे. मात्र देशभरात सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि भाजपने दिल्लीतील उमेदवारांची घोषणा केली आहे. दिल्लीतल्या सात जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. अशातच इंडिया आघाडीच्या माध्यमातून आप आणि काँग्रेसने भाजपविरोधी वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. आप पक्षाचा महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे.
आम आदमी पक्षाने शनिवारी दिल्लीच्या सिव्हिक सेंटरमध्ये आयोजित केलेल्या महिला सन्मान सोहळ्यापासून आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच आलेल्या दिल्लीच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान योजनेंतर्गत 1000 रुपये देण्याची घोषणा आप सरकारतर्फे करण्यात आली आहे. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांना पतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जप केल्यास त्यांना जेवण देऊ नये, असे सांगितले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या कार्यक्रमातून दिल्लीतील महिला मतदारांची भेट घेतली. यादरम्यान केजरीवाल यांनी महिला मतदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी महिलांना पतीला मनवण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. "तुमचा नवरा मोदी-मोदी बोलत असेल तर त्याला जेवण देऊ नका, त्याला डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगा, यानंतर प्रत्येक पतीला आपल्या पत्नीचे पालन करावे लागेल," असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.
"तुमच्या पतीला हे पण सांगा की, मी त्यांची वीज मोफत केली आहे, त्यांची बसची तिकिटे मोफत केली आहेत आणि आता मी महिलांना दरमहा एक हजार रुपये देत आहे. भाजपने त्यांच्यासाठी काय केले आहे? मग भाजपला मत का द्यायचे? यावेळी केजरीवाल यांना मत द्या," असेही केजरीवाल म्हणाले.
"घरी बसू नका, ते अतिशय धोकादायक आहेत. ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड झाली असेल कुणास ठाऊक, पण जर 10 टक्के मते इकडे तिकडे गेली तर 20 टक्के जास्त काम करावे लागेल. आता आपल्या पती, भाऊ, वडील आणि परिसरातील इतर लोकांना आपल्या फायद्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करण्यासाठी पटवून देण्याची जबाबदारी आपली आहे," असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.