`जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तर देशात कधीच...,` निर्मला सीतारमन यांच्या पतीच्या विधानामुळे खळबळ, `देशात मणिपूर...`
LokSabha Election: केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमन (Nirmala Sitharaman) यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर (Parakala Prabhakar) यांनी जर भाजपा सरकार तिसऱ्यांदा निवडून आलं तर देशाचं पूर्ण चित्रच बदलेल असं विधान केलं आहे. काँग्रेसने त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
LokSabha Election: जर भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला त देशात पुन्हा निवडणूक होणार नाही असा खळबळजनक दावा केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमन (Nirmala Sitharaman) यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर (Parakala Prabhakar) यांनी केला आहे. जर एनडीए सरकार तिसऱ्यांदा निवडून आलं तर देशाचं पूर्ण चित्रच बदलेल असं विधान केलं आहे. काँग्रेसने त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मणिपूरसारखी स्थिती संपूर्ण देशात होऊ शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसने एक्स अकाऊंटवर परकला प्रभाकर यांचा मुलाखतीमधील 1 मिनिटं 49 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी पोस्टमध्ये त्यांची काही विधानांचा उल्लेख केला आहे. "2024 मध्ये जर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले, तर देशात पुन्हा कधीच निवडणूक होणार नाही. देशाचं संविधान बदलेल. मोदी स्वत: लाल किल्ल्यावरुन द्वेषयुक्त भाषण देतील. देशात लडाख मणिपूरसारखी स्थिती होईल", असं परकला प्रभाकर म्हटल्याचं काँग्रेसने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. परकलाजी हे अर्थतज्ज्ञ आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. मुलाखतीदरम्यान त्यांना जर तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार सत्तेत आलं तर काय होईल? असं विचारण्यात आलं. त्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, "जर असं झाल्यास तुम्ही आणखी एका निवडणुकीची अपेक्षा करु शकत नाही. 2024 च्या निवडणुकीनंतर हे सरकार परत आलं तर त्यानंतर निवडणूक होणार नाही".
पुढे त्यांनी सांगितलं की, "सध्या आपल्याकडे जे देशाचं संविधान आणि नकाशा आहे तो पूर्णपणे बदलून जाईल. तुम्ही त्याला ओळखूही शकणार नाही. आपल्याला सध्या पाकिस्तानला पाठवू, याला मारु, पळवून लावू अशा गोष्टी ज्या धर्मसंसदेत ऐकायला मिळत आहेत त्या लाल किल्ल्यावरुन ऐकायला मिळतील. अत्यंत जाहीरपणे हे सगळं बोललं जाईल. हाच सर्वात मोठा धोका आहे".
यावेळी त्यांनी संपूर्ण देशात मणिपूरसारखी स्थिती निर्माण होऊ शकते असा इशाराही दिला आहे. "आता तुम्हाला वाटत असेल की, हिंसाचार मणिपूरमध्ये होत आहे. त्यामुळे आपल्याकडे होण्याची काही शक्यता नाही. पण असा विचार करण्याची गरज नाही. कारण आज जे मणिपूरमध्ये होत आहे, ते उद्या तुमच्या राज्यातही होऊ शकतं. आता लडाख आणि मणिपूरमध्ये जी स्थिती आहे किंवा शेतकऱ्यांना जी वागणूक मिळत आहे ते संपूर्ण देशात होऊ शकतं".