LokSabha: ...जेव्हा विरोधकांच्या महारॅलीला उत्तर देण्यासाठी सरकारने दूरदर्शनवर लावला `बॉबी` चित्रपट, पुढे काय झालं?
Lok Sabha Election: जेव्हा देशात इंदिरा गांधींचं सरकार होतं, तेव्हा आणीबाणीनंतर अचानक निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान यावेळी विरोधकांनी संयुक्त रॅलीची घोषणा केली तेव्हा त्यांना रोखण्यासाठी सरकारने दूरदर्शनवर बॉबी चित्रपट लावला होता. पण पुढे काय झालं ते जाणून घ्या...
Lok Sabha Election: राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक कोणत्या स्तराला जाऊ शकतात हे गेल्या काही वर्षात प्रकर्षाने जाणवत आहे. एकीकडे सत्ता टिकवून ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु असतात, तर दुसरीकडे सत्ता मिळवण्यासाठी विरोधक रणनीती आखत असतात. राजकारणातील असाच एक मनोरंजक किस्सा जाणून घ्या. हा किस्सा 1977 सालचा आहे, जेव्हा देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं सरकार होतं.
त्यावेळी इंदिरा गांधी यांनी अचानक सार्वजनिक निवडणुकीची घोषणा करत विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. एके दिवशी जगजीवन राम यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर विरोधकांनी दिल्लीच्या रामलीला मैदानात महारॅली होईल असं जाहीर केलं. 'द इमर्जन्सी, अ पर्सनल हिस्ट्री' चे लेखक कूमी कपूर यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, माहिती आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ल यांनी लोकांना महारॅलीत जाण्यापासून रोखण्यासाठी दूरदर्शनवर रविवारी लागणाऱ्या चित्रपटाच्या वेळेत बदल केला. त्यांनी दूरदर्शनवर ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा 'बॉबी' चित्रपट लावला.
1973 मध्ये प्रदर्शित झालेला ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांची प्रमुख भूमिका असणारा बॉबी चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामुळे हा चित्रपट टीव्हीवर लागल्यावर लोक पाहण्यासाठी घरी थांबतील अशी सरकारला अपेक्षा होती. पण आणीबाणीमुळे लोक इतके नाराज होते की, टीव्हीवर चित्रपट पाहण्याऐवजी रॅलीत पोहोचले. जेपी आणि जगजीवन राम यांची भाषणं ऐकण्यासाठी जनता पोहोचली होती.
बससेवा ठप्प
भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी त्या दिवसाची आठवण सांगताना म्हटलं होतं की, तेव्हा लोकांची गर्दी उसळली होती. इतकी गर्दी याआधी कधी दिसण्यात आली नव्हती. परिस्थिती अशी होती की, बससेवा बंद करण्यात आली होती. पण तरीही लोक चालत या रॅलीत सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.
असं म्हणतात की, इंदिरा गांधींना निवडणुकीची घोषणा करुन चरण सिंग, अटल बिहारी वाजपेयी, चंद्रशेखर अशा दिग्गज नेत्यांचं मनोबल खच्चीकरण करायचतं होतं. अनेक नेते त्यावेळी जेलमधून बाहेर आले होते, तर काहीजण अद्यापही जेलमध्ये होते. यानंतर बरीच हेराफेरी चालू झाली होती. विरोधी जनता पक्षासाठी घऱोघऱी फिरून निधी गोळा करण्यात आला होता.
त्यावेळी इंदिरा गांधीच्या राजकीय सल्लागारांनी त्यांना विरोधी पक्ष कमकुवत आहे किंवा त्यांचं अस्तित्वच नाही, त्यामुळे लवकरात लवकर निवडणूक घ्या असा सल्ला दिला. यामुळे विरोधकांना तयारी करण्यासाठी जास्त संधी मिळणार नाही आणि सरकार सहजपणे निवडणूक जिंकेल असं त्यांनी सांगितलं होतं. यानंतर इंदिरा गांधी 18 जानेवारी 1977 ला अचानक देशाला संबोधित करत सार्वजनिक निवडणुकीची घोषणा केली. विरोधी पक्षातील काही नेते त्यावेळीही जेलमध्ये बंद होते.
2 फेब्रुवारीला काँग्रेसच्या 3 मोठ्या नेत्यांनी राजीनामा देत, जनता पार्टीसह जाण्याचा निर्णय घेतला होता. बाबू जगजीवन राम, हेमवती नंदन बहुगुणा आणि नंदिनी सत्पथी हे ते तीन होते. नंदिनी ओडिशाच्या मुख्यमंत्रीही होत्या. यानंतरच ही महारॅली झाली होती. या निवडणुकीत जनता पार्टीचा विजय झाला होता.