LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाने (BJP) या यादीतून एकूण 34 विद्यमान खासदारांना वगळलं आहे. यामध्ये भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांचाही समावेश आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी खासदार असताना अनेक वादग्रस्त विधानं केली होती. दरम्यान पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी यामागील शक्यता सांगितली आहे. कदाचित माझे काही शब्द नरेंद्र मोदींना आवडले नसावेत असं प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाने शनिवारी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भोपाळ मतदारसंघातून यावेळी प्रज्ञा ठाकूर यांच्या जागी आलोक शर्मा यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपाने मध्य प्रदेशातील 29 जागांपैकी 24 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये राज्यातील दोन विद्यमान खासदार प्रज्ञा ठाकूर आणि केपी शर्मा यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. के पी शर्मा यांच्या जागी ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूक लढणार आहेत. 



प्रज्ञा ठाकूर यांनी तिकीट नाकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "हा पक्षाचा निर्णय आहे. मला तिकीट मिळालं पाहिजे किंवा का मिळालं नाही याबद्दल विचार करता कामा नये. मी याआधीही तिकीट मागितलं नव्हतं, आणि आताही मागणार नाही".


'नरेंद्र मोदी म्हणाले होते, माफ करणार नाही'


पुढे त्यांनी म्हटलं की, "माझी काही विधानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडली नव्हती. त्यांनी मी त्यांना माफ करणार नाही असं म्हटलं होतं. मी त्या विधानांसाठी आधीच माफी मागितली होती". प्रज्ञा ठाकूर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला 'खरा देशभक्त' म्हटलं होतं. यावर नाराजी जाहीर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशी विधानं करणाऱ्यांना मी माफ करणार नाही असं म्हटलं होतं. 


प्रज्ञा ठाकूर यांनी यावेळी काँग्रेसवर टीका करताना, माझं सत्य बोलणं विरोधकांना खटकतं आणि ते माझ्या आडून मोदींवर हल्ला करतात असा आरोप केला. दरम्यान प्रज्ञा ठाकूर यांनी आपण नथुराम गोडसेबद्दल केलेलं विधान योग्य आहे सांगताना म्हटलं की, 'मी सत्य बोललो, पण मीडियाने वादग्रस्त विधान म्हणत वाद निर्माण केला'.


यावेळी त्यांनी आपण पक्ष सोडणार नसल्याचंही सांगितलं. त्यांनी म्हटलं की, "माझा पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नाही. पक्ष जी काही जबाबदारी देईल ती मी निभावेन आणि जिथे गरज असेल तिथे उपलब्द असेन".