अखेर मुसक्या आवळल्या!, विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी
प्रत्यार्पणाचे प्रकरण ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे सुपूर्द
लंडन - भारतातील बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये फरार झालेला मद्यव्यावसायिक विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाला सोमवारी वेस्टमिनिस्टर येथील न्यायालयाने मंजुरी दिली. यामुळे मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्जबुडवेगिरी आणि पैशांची अफरातफर या प्रकरणात मल्ल्या सोमवारी ब्रिटनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयात हजर झाला. यापूर्वी प्रत्यार्पण प्रकरणात त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याला मुदतवाढ देण्यास न्यायालयाने नकार दिला आणि प्रत्यार्पणाचे प्रकरण ब्रिटनच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटकडे सुपूर्द केले. केंद्रीय अन्वेषण विभागाने वेस्टमिनिस्टर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
वेस्टमिनिस्टर न्यायालयातील मुख्य जज एम्मा आबुथनॉट यांनी या प्रकरणी निकाल दिला. या निर्णयानंतर हे प्रकरण ब्रिटनच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटकडे देण्यात आले आहे. ते या संदर्भातील पुढील निर्णय घेतील. दोन्ही पक्षकार या प्रकरणी ब्रिटनच्या उच्च न्यायालयात दाद मागू शकतात. त्यानंतर मल्ल्या कधी भारतात परतेल हे स्पष्ट होईल. दरम्यान, आपण एकही रुपयाचे कर्ज घेतलेले नाही. किंगफिशर एअरलाईन्सने हे कर्ज घेतले होते. कंपनी तोट्यात गेल्यामुळे हे कर्ज बुडाले. मी फक्त गॅरंटी दिली होती. त्याचा अर्थ मी कर्ज बुडवले असा होत नाही, असे ट्विट मल्ल्याने केले आहे. बॅंकांचे मुद्दल १०० टक्के परत देण्यास मी तयार आहे. त्याचा विचार केला जायला हवा. प्रत्यार्पणाचा खटला ब्रिटनमधील न्यायालयात गेल्या वर्षी चार डिसेंबरला सुरू झाला होता.
सीबीआयचे पथक ब्रिटनमध्ये
या प्रकरणाची सुनावणी सुरू असल्याने सीबीआयचे एक पथक सहव्यवस्थापक एस साई मनोहर यांच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटनमध्येच उपस्थित आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळीही हे पथक न्यायालयात उपस्थित होते. लूकआऊट नोटिसीतील त्रुटींचा फायदा घेऊन मल्ल्याने २०१६ मध्ये परदेशात पलायन केले होते.