मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच देशाच्या ११ राज्यांमधील ५८ विधानसभा जागांसाठीच्या पोटनिवडणुकांचा निकालही आज लागणार आहे. मध्यप्रदेशातल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर तिथल्या भाजप सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशातल्या सर्वाधिक २८  जागांसाठी आज मतमोजणी होतेय. इथली सत्ता राखण्यासाठी भाजपला किमान ८ जागा जिंकणे गरजेचे आहे. 



गुजरात, उत्तर प्रदेशकडेही नजरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधल्या ८ आणि उत्तर प्रदेशातल्या ७ जागांच्या पोटनिवडणूक निकालालाही महत्त्व आहे. त्याशिवाय कर्नाटक, ओडिशा, झारखंड नागालँड, तेलंगणा, छत्तीसगढ आणि हरियाणामध्येही पोटनिवडणुका झाल्या. त्याठिकाणीही आज मतमोजणी होणार आहे.


बिहारमध्ये सत्ताबदल होणार का?


बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागांसाठी मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. निकालाचा कल सकाळी ९ वाजल्यापासून येण्याची शक्यता आहे. तर प्रत्यक्ष निकाल दुपारी ३ वाजल्यानंतर घोषित होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे काळजी घेत हे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व ३८ जिल्ह्यांत मतमोजणीसाठी ५५ केंद्रे स्थापन केली आहेत.


तेजस्वी यादव आणि त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाचे प्रचंड अनुभवी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील लढतीचा फैसला आज होत आहे. दरम्यान, एक्झिट पोलने तेजस्वी यादव यांना पसंती दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताबदल होणार का, याचीच उत्सुकता आहे.


बहुतांश एक्झिट पोल्सनी सत्तांतराचा अंदाज वर्तवला असताना मतमोजणी केंद्रांवर तणाव वाढण्याची भीती निवडणूक आयोगाला वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणी केंद्रीय पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली आहेत. तेजस्वी यादव वैशाली जिल्ह्यातल्या राघोपूरमधून तर त्यांचे थोरले बंधू तेजप्रताप समस्तीपूर जिल्ह्यातल्या हसनपूरमधून निवडणूक लढवत आहेत.