मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आयुष्यभर अविवाहीत राहिले... परंतु, याचा अर्थ त्यांना प्रेमाचा अर्थच ठाऊक नव्हता असा होत नाही... किंबहुना त्यांनी प्रेमाचा खरा अर्थ कळला होता, असं म्हणायला हरकत नाही. वाजपेयींच्या या प्रेमाचा धागा जुळला तो ग्वालियरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये असताना... आणि हे नातं कायम राहिलं ते २ मे २०१४ पर्यंत... याच दिवशी राजकुमारी कौल यांचं निधन झालं होतं... परंतु, अटलजींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं त्यांच्या विरोधकांनाही कधी शक्य झालं नाही.


महाविद्यालय आणि प्रेमपत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही तरल प्रेमकहाणी सुरू झाली १९४० च्या दशकात... ग्वालियर ही वाजपेयींची जनमभूमी... ग्वालियरच्या विक्टोरिया महाविद्यालयात (सध्याचं लक्ष्मीबाई महाविद्यालय) शिकत असताना इथंच त्यांच्या नजरेस पडल्या होत्या राजकुमारी कौल... वाजपेयी आणि राजकुमारी कॉमेजमध्ये चांगले मित्र-मैत्रिण होत्या... हा तो काळ होता जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी उघडपणे बोलण्यासही संकोचत असत... 


पत्राला न मिळालेलं उत्तर...


'अटल बिहारी वाजपेयी : ए मॅन ऑफ ऑल सीजन्स' या वाजपेयींच्या आयुष्यावर आधारीत पुस्तकात लेखक आणि पत्रकार किंगशुक नाग यांनी केलेल्या उल्लेखाप्रमाणे, तरुण वयातील अटलजींनी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी राजकुमारीला एक पत्रंही लिहिलं होतं... परंतु, या पत्राला कधी उत्तरच मिळालं नाही. नाग यांच्या म्हणण्यानुसार, राजकुमारीलाही अटलजींसोबत आपलं आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा होती परंतु, त्यांच्या कुटुंबाचा याला प्रचंड विरोध होता... अटलजी ब्राह्मण कुटुंबातील होते तर कौल कुटुंब स्वत:ला उच्च कुळातील मानत होते.   


महाविद्यालयात शिकत असताना वाजपेयी आरएसएसचे प्रचारक म्हणून काम करत असतानाच जनसंघाच्या राजकारणाशीही जोडले गेले... तर दुसरीकडे राजकुमार कौल या लग्नानंतर मिसेस कौल बनल्या आणि दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रामजस कॉलेजमध्ये राहायला आल्या... राजकुमारी कौल यांचं पती ब्रिजनारायण कौल म्हणजे जवाहरलाल नेहरु यांचे मेव्हणे, म्हणजेच कमला नेहरू यांचे भाऊ...


...पुन्हा एकदा भेट


लग्नानंतर राजकुमारी आणि वाजपेयींची पुन्हा एकदा गाठ पडली... ती तब्बल एक - दीड दशकानंतर... दिल्लीच्या राजकीय वर्तुळात राजकुमारींना 'मिसेस कौल' नावानं ओळखलं जाई... ब्रिजनारायण कौल रामजस महाविद्यालयात हेड ऑफ डिपार्टमेंट बनले होते... कौल कुटुंब याच कॅम्पसमध्ये राहत होतं... वाजपेयी यांनी राजकुमारींशी असलेल्या आपल्या नात्याची वाच्यता कधीही सार्वजनिकरित्या केली नाही... परंतु, बीएन कौल यांच्या घरात ते दीर्घकाळ वास्तव्यासाठी होते.


एक तरल नातं...


८० च्या दशकात एका मुलाखतीत आपल्या नात्यावर बोलताना मिसेस कौल यांनी म्हटलं होतं 'मला आणि अटलजींना कधी आपल्या नात्याचं माझ्या पतीसमोर स्पष्टीकरण द्यावं लागलं नाही... आमचं नातं समजून घेण्याच्या स्तरावर खूपच मजबूत आहे'


वाजपेयी पंतप्रधान पदावर आरुढ असताना राजकुमारी त्यांच्या कौटुंबिक सदस्य होत्या. पंतप्रधान निवास ७, रेसकोर्स रोडवर त्या मुलगी नमिता आणि जावई रंजन भट्टाचार्य यांच्यासोबत राहत होत्या. अटलजींचे माजी सहाय्यक सुधींद्र कुलकर्णी यांनी एका लेखात राजकुमारी कौल यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा उल्लेख 'वाजपेयींच्या दत्तक मुलींची आई' असा केला होता. वास्तवात जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी कौल कुटुंबासोबत राहण्यास सुरुवात केली होती तेव्हा त्यांनी ब्रिजनारायण-राजकुमारी यांच्या दोन्ही मुलींना नमिता आणि नम्रता यांना दत्तक घेतलं होतं. या दरम्यान वाजपेयी यांच्यासोबतच त्यांच्या घराची संपूर्ण जबाबदारी मिसेस कौल यांनीच समर्थपणे पेलली होती.
 
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदावर बसण्यापूर्वीच ब्रिजमोहन कौल यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूसमयी स्वास्थ्याच्या कारणानं ब्रिजमोहन न्यूयॉर्कला स्थायिक झालेली आपली डॉक्टर मुलगी नम्रता हिच्याकडे राहायला गेले होते... तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.


अटल बिहारी वाजपेयी दत्तक मुलगी नमिता, नात निहारीका आणि जावई भट्टाचार्य यांच्यासोबत (जून २००३)

वाजपेयींच्या कौटुंबिक सदस्य


राजकुमारी कौल यांचं अविवाहीत वाजपेयींशी नेमकं काय नातं होतं? हा प्रश्न त्या दोघांनाही कधी पडला नव्हता... परंतु, २०१४ साली राजकुमारी कौल यांच्या निधनानंतर वाजपेयी यांच्या निवासस्थानातून एक प्रसिद्धी पत्रक निघालं होतं... यात त्यांचा उल्लेख 'वाजपेयी यांच्या कौटुंबिक सदस्य' म्हणून करण्यात आला होता. उल्लेखनीय म्हणजे, ही घटना घडली तेव्हा वाजपेयी स्वत: अल्जायमर रोगानं आजारी होते... हे पत्रक लिहिण्यात त्यांचा सहभाग नव्हता... परंतु, मिसेस कौल अटलजींच्या काहीही नसूनदेखील सर्व काही होत्या हे त्यांना ओळखणाऱ्या अनेकांना ठावूक होतं. कठिण प्रसंगी अटलजींना भावनात्मक देणाऱ्या मिसेस कौल याच होत्या... त्यांचं निधन झालं तेव्हा २०१४ च्या निवडणुकांचा प्रचार जोरावर होता. परंतु, तरीदेखील कौल यांच्या अंत्यदर्शनासाठी लालकृष्ण आडवणी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज तसंच सोनिया गांधी यादेखील अटलजींच्या घरी दाखल झाल्या होत्या. 


कौल यांच्या निधनानंतर मीडियात त्यांचा उल्लेख आला होता. पत्रकार कुलदीलप नायर यांनी 'टेलिग्राफ'मध्ये लिहिलं होतं, 'संकोची मिसेस कौल अटल यांच्या सर्व काही होत्या. ज्यापद्धतीनं त्यांनी सेवा केली, अभावानच कुणी करू शकेल. हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन होईपर्यंत त्या नेहमी अटलजींसोबत राहिल्या'... तर इंडियन एक्सप्रेसनं केलेल्या उल्लेखाप्रमाणे, 'अटल आणि मिसेस कौल यांनी आपल्या नात्याला कोणतंही नाव दिलं नाही आणि दोघांनीही यावर कायम मौन पाळलं'