डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, गॅस सिलिंडर दरात मोठी वाढ
LPG Price Hike : महागाईचा पुन्हा एकदा चांगलाच झटका बसला आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी हा मोठी झटका बसला आहे.
मुंबई : LPG Price Hike : महागाईचा पुन्हा एकदा चांगलाच झटका बसला आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी हा मोठी झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडर (LPG Price Hike) स्वस्त होण्याऐवजी महाग झाला आहे. 1 डिसेंबरपासून गॅस सिलिंडर 100 रुपयांनी महाग झाला आहे. (LPG Price Hike: Commercial Cooking Gas Cylinder Price Hiked By Rs 100. Check Latest Rate In Your City)
वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा जनतेला महागाईचा जबर फटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून गॅसच्या दरात (एलपीजी प्राइस हायक) वाढ केली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये झाली असून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर उपाहारगृहातील खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक सिलिंडर 2100 रुपयांच्या घरात
दरम्यान, पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल, डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र, पूर्णत: मोदी सरकारकडून निराशा झाली आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाल्यानंतर देशाच्या राजधानीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 2101 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी 1 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 266 रुपयांनी वाढ करण्यात आली होती आणि गॅसची किंमत 2000.50 रुपये होती.
महानगरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत
100 रुपयांच्या वाढीनंतर कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2177 रुपयांवर पोहोचली आहे, तर मुंबईत 19 किलोचा सिलिंडर 2051 रुपयांना मिळणार आहे. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरसाठी 2234 रुपये मोजावे लागणार आहेत.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही दरात वाढ
यापूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1 सप्टेंबरला 43 रुपयांनी आणि 1 ऑक्टोबरला 75 रुपयांनी वाढली होती.
घरगुती गॅस सिलिंडर किंमतीत वाढ नाही
यावेळी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि गेल्या ऑक्टोबरमध्ये या किमती वाढवण्यात आल्या होत्या. दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत आता 899.50 रुपये आहे. कोलकातामध्ये घरगुती गॅसची किंमत 926 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये 14 किलोच्या सिलिंडरची किंमत 915.5 रुपये आहे.
तुमच्या शहरातील किमती तपासा
तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाणून घ्यायच्या असतील, तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ते पाहू शकता. यासाठी, तुम्हाला IOCL वेबसाइटला भेट द्यावी लागेल (cx.indianoil.in/webcenter/portal/Customer/pages_productprice). यानंतर, वेबसाइटवर राज्य, जिल्हा आणि वितरक निवडा आणि नंतर शोध वर क्लिक करा. यानंतर गॅस सिलिंडरच्या किमती तुम्हाला तात्काळ समजू शकेल.