नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भारताचे पुढचे लष्कर उपप्रमुख म्हणून निवड झालीय. लेफ्टनंट जनरल एम. एम. नरवणे सध्या पूर्व विभागाच्या प्रमुखपदी कार्यरत आहेत. आता त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय. लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे हे शीख लाईट इन्फन्ट्रीचे अधिकारी आहेत. लष्करप्रमुखपदाच्या शर्यतीतले सर्वाधिक वरिष्ठ अधिकारी ते आहेत. आता लष्कर उपप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्याने त्यांचं यादृष्टीने एक पाऊल पुढे पडलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लेफ्टनंट जनरल डी. अंबू येत्या ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार मराठी अधिकारी मनोज नरवणे हे लष्कराच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार सांभाळतील. 


सूत्रांच्या माहितीनुसार, लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे हे सेनाप्रमुख पदाचेही दावेदार असू शकतात. येत्या ३१ डिसेंबर रोजी जनरल बिपिन रावत हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यावेळीली नरवणे सर्वात वरिष्ठ कमांडर असतील. 



लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांचा दहशतवाद विरोधी अभियानासोबत अनेक सैन्य कारवाईत सहभाग होता. ते जम्मू-काश्मीरच्या राष्ट्रीय रायफल बटालियन आणि इस्टर्न फ्रंटचे इन्फन्ट्री ब्रिेगेडचे कमांडर राहिलेत.