महाराष्ट्रासह देशात लम्पी व्हायरसचा कहर, देशभरात 58 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू
महाराष्ट्रात तातडीने उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश...
Lumpy skin disease : देशासह अनेक राज्यांमध्ये लम्पी रोगाचा (Lumpi Disease) कहर वाढत चालला आहे. 15 राज्यांतल्या 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झालाय. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झालीय. तर आत्तापर्यंत 57 हजार गायींचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रात (Maharashtra) 17 जिल्ह्यांमध्ये या आजाराचा फैलाव झालाय. लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्यात आलेत.
लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांकडून उपाययोजना तसंच लसीकरण (Vaccination) करण्यात येतंय. सध्या लम्पीचा संसर्ग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पसरत असल्याचं चित्र दिसतंय. लम्पी आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागानं आवश्यक पावलं तातडीनं उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Meeting) बैठकीत दिले आहेत.
जाणून घेऊयात लम्पी आजाराची लक्षणं (Lumpy skin disease Symptoms)
जनावरांच्या डोळ्यांतून, नाकातून पाणी
लसिकाग्रंथींना सूज येणं, ताप येणं
दुधाचं प्रमाण कमी होणं
तोंडात व्रण आल्याने चारा खाणे, पाणी पिणे कमी होणं
त्वचेवर मोठ्या गाठी येणं
पायावर सूज आल्यानं जनावरं लंगडतात
या कठीण परिस्थितीत बळीराजाने जनावरांची कशी काळजी घ्यावी हे देखील पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे
जनावरांची काळजी कशी घ्याल?
निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळं बांधा
गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नका
बाधित गावांमध्ये चारा-पाण्याची स्वतंत्र सोय करा
निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करा
दूध उकळून प्या
डॉ. राजोरिया म्हणाले की, संसर्ग झालेल्या जनावराच्या दुधात विषाणू आढळून आल्याची कोणतीही माहिती अद्याप झालेली नाही. परंतू खबरदारीचा उपाय म्हणून दूध उकळूनच प्यावे. डॉ. रमण शर्मा यांनी सांगितले की, मानवामध्ये लम्पीसारखा कोणताही विषाणू नाही. मानवांमध्ये त्याचा प्रसार झाल्याची अशी कोणतीही घटना घडलेली नाही.