वर्षातील पहिलं चंद्रग्रहण; भारतात कोणत्यावेळी, कसं दिसणार `छायाकल्प चंद्रग्रहण`?
का म्हटलं जातंय `छायाकल्प चंद्रग्रहण`?
मुंबई : नव्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आज पाहायला मिळणार आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी तब्बल चार तास असणार आहे. हे चंद्रग्रहण रात्री 10.30 वाजता सुरू होणार आहे. या चंद्रग्रहणाला ग्रहण म्हटलं जाणार नाही हे चंद्रग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे. यावेळी चंद्राची प्रतिमा धुसर होताना दिसणार आहे.
हे चंद्रग्रहण रात्री 10 वाजून 37 मिनिटांनी सुरु होईल आणि रात्री 2 वाजून 42 मिनिटांनी संपेल. हा कालावधी एकूण 4 तास 5 मिनिटं इतका असणार आहे. याआधी 11 फ्रेब्रुवारी 2017 ला अशा प्रकारचं चंद्रग्रहण झालं होतं.
भारतात यावेळी दिसणार छायाकल्प चंद्रग्रहण
भारतात या छायाकल्प चंद्रग्रहणाला रात्री 10 वाजून 37 मिनिटांनी 10 जानेवारी रोजी सुरूवात होणार आहे. अवकाशात संपूर्ण चंद्रग्रहण हे रात्री 12 वाजून 41 मिनिटांनी दिसणार आहे. यावेळी जवळपास 90 टक्के चंद्र हा पृथ्वीच्या सावलीने झाकलेला असेल. ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण दिसते.
भारतासह हे चंद्रग्रहण अमेरिका, कॅनडा, ब्राझील, अर्जेंटीना अशा देशांमधून दिसणार आहे. या ग्रहणाला यूरोप आणि अमेरिकेतील देशांनी वुल्फ एक्लीप्स असं नाव दिलंय. 2020 या वर्षात एकूण 6 ग्रहणं असतील. यापैकी 4 चंद्रग्रहणं आणि 2 सूर्यग्रहणं असणार आहेत. तर 2020 या नवीन वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 21 जूनला असणार आहे.
2019 च्या अगदी शेवटच्या महिन्यात संपूर्ण जगाला अद्भुत असं सूर्यग्रहण पाहायला मिळालं. खगोलप्रेमींकरता ही सुवर्णसंधी होती. या सूर्यग्रहणाला 'रिंग ऑफ फायर' असं संबोधण्यात आलं. 2020 च्या सुरूवातीलाच चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण झाली. या छायाकल्प चंद्रग्रहणाला अमेरिका आणि युरोपकडून 'वुल्फ एक्लीप्स' असं नाव देण्यात आलं. युरोपमध्ये खगोल घटनांना अशी नावे देण्याची पद्धत आहे.
२०२० मध्ये चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ,लीपवर्ष असल्याने कामासाठी वर्षात एक दिवस जास्त , खगोलप्रेमींसाठी कंकणाकृती सूर्यग्रहण दर्शन, सुपर मून दर्शन, ब्ल्यू मून योग , सुवर्ण खरेदी करणारांसाठी चार गुरुपुष्य योग, आश्विन अधिकमास आणि विवाहेच्छुकांसाठी भरपूर विवाह मुहूर्त आहेत. सन २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीत २९ दिवस आल्याने या वर्षात एकूण ३६६ दिवस मिळणार आहेत. कामांची पूर्तता करण्यासाठी १ दिवस जास्त मिळणार आहे.