Madhavi Raje Scindia Death: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीया) यांना आई माधवी राजे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. माधवी राजे या कित्येक दिवसांपासून आजारी होत्या आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. माधवी राजे यांच्या निधनानंतर शिंदे घराण्यावर शोककळा पसरली आहे. माधवी राजे या नेपाळच्या राजघराण्याच्या राजकुमारी होत्या. 1966 साली त्यांचा विवाह ग्वाल्हेरच्या राजकुमार माधवराव शिंदे यांच्यासोबत झाला आणि त्या भारताच्या नागरिक झाल्या. पण तुम्हाला माहितीये का ज्योतिरादित्य शिंदे यांचा महाराष्ट्राशी थेट संबंध आहे. शिंदेंचे पूर्वज यांनी मराठा सम्राजासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.  कोण आहेत ज्योतिरादित्य शिंदे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेरच्या राजघरण्याचे राजे आहेत. पण त्यांचे मुळ मात्र महाराष्ट्रात आहे. सातारा येथील कण्हेरखेड हे शिंदेंचे मूळ गाव. शिंदे घराण्याचे प्रमुख राणोजी शिंदे ते शिंदे घराण्याचे संस्थापक असल्याची मान्यता आहे. राणोजी शिंदे यांना पाच मुलं त्यापैकी एक महादजी शिंदे. महादजी वडिलांसोबत वयाच्या दहाव्या वर्षापासून रणांगणावर जात आहे. त्यांना लष्करी प्रशिक्षण मिळालं होतं. त्यांनी अनेक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या.  इंग्रजांकडून त्यांना द ग्रेट मराठा असं म्हटलं जाई. पानिपतच्या युद्धानंतर मराठा सम्राजाला पुन्हा एकदा झळाळी मिळवून देण्याचे काम महादजी शिंदेंनी केले. 


मल्हारराव होळकरांच्या साथीने शिंदेंनी अनेक संस्थानं मराठा सम्राज्याखाली आणली. शिंद्यांनी पानिपतच्या लढाईत मोठ्या हिरारीने सहभाग घेतला होता. या लढाईत महादजी शिंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांचा पाय अधु झाला पुढे जन्मभर तो तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर शिंदे घराण्याची सूत्र महादजींकडे आली. तसंच, पानिपतच्या लढाईनंतर मराठा सम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थान बनले व ग्वाल्हेर त्यांचे संस्थान बनले. 1758 मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज प्रस्थापित केले. मात्र, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्वाल्हेर संस्थान भारतात विलीन करण्यात आले. 


ग्वाल्हेर संस्थानावर शिंदे घराण्यातील शासक


जयाप्पाराव (इ.स १७५०-१७६१)
महादजी शिंदे (इ.स. १७६१-१७९४)
दौलतराव (इ.स. १७९४-१८४३)
बायजाबाई (दौलतरावांची विधवा पत्‍नी, इ.स. १८२७-१८३३)
जनकोजी (इ.स. १८८६-१९२५)
जयाजीराव (इ.स. १८४३-१८८६)
माधवराव (इ.स. १८८६-१९२५)
जिवाजीराव (इ.स. १९२५-१९४८).


राजकारणातील शिंदे घराणे


विजयाराजे शिंदे


विजयाराजे शिंदे या शिंदे घराण्यातील पहिली व्यक्ती जी राजकारणात सक्रीय झाली. विजयराजे सिंधिया यांनी 1957 मध्ये काँग्रेस पक्षातून आपली राजकीय वाटचाल सुरु केली. त्यांनी गुना लोकसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली आणि त्या खासदार झाल्या. मात्र नंतर त्यांनी 1967 मध्ये त्यांनी जनसंघात प्रवेश केला. विजयराजे यांच्यामुळे जनसंघ ग्वालियर संस्थान (पूर्वीचे) भक्कम झाला.


माधव राजे शिंदे


विजयाराजे शिंदे यांचे पुत्र म्हणजे माधवराजे शिंदे. माधवराव वयाच्या 26व्या वर्षीच खासदार झाले. 1980 साली त्यांनी काँग्रेसमधून निवडणुक लढवली आणि केंद्रात मंत्री बनले. मात्र, 2001मध्ये त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. 


ज्योतिरादित्य शिंदे


काँग्रेस नेते माधरवार शिंदे यांचे पुत्र ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील सक्रीय राजकारणात आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसमधूनच राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. मात्र नंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. 


(या बातमीसाठी माहिती विकिपीडियावरुन साभार)