`हे` मतदारसंघ ठरवणार मध्य प्रदेशचा निकाल
काँग्रेससाठी हा विजय एकप्रकारे नवसंजीवनी ठरेल.
भोपाळ: मध्य प्रदेशात बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले. यानंतर काँग्रेस आणि भाजपकडून आपापल्या विजयाचा दावा केला जात असला तरी लोकांच्या प्रतिक्रिया पाहता मध्य प्रदेशातील निकालाविषयी राजकीय जाणकरांच्या मनातही संभ्रमच आहे. मध्य प्रदेशात विजय मिळाल्यास आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला नवसंजीवनी मिळू शकते. तर भाजपसाठी मध्य प्रदेशातील विजय म्हणजे आणखी एक विजयी अध्याय ठरेल. मात्र, एकूणच परिस्थिती पाहता राज्यातील प्रमुख शहरांमधील कल निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकू शकतात.
भोपाळ
भोपाळमध्ये दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील लढाई सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जात आहे. याठिकाणी भाजपकडून उमाशंकर गुप्ता नशीब आजमावत आहेत. या मतदारसंघात श्यामला हिल्सचा परिसर येतो. गेल्या अनेक टर्मपासून या मतदारसंघावर भाजपचा कब्जा आहे. काँग्रेसचे पीसी शर्मा त्यांच्याविरोधात रिंगणात उतरले आहेत. गेल्या तीन निवडणुकांमध्ये पीसी शर्मा यांच्या नावाची जोरदार चर्चा राहिली होती. मात्र, त्यांना एकदाही विजय मिळू शकला नव्हता. परंतु यंदाची बदललेली परिस्थिती पीसी शर्मा यांच्या विजयाची शक्यता वाढली आहे.
यानंतर भोपाळ मध्य हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. येथून काँग्रेसचे आरिफ मसूद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भोपाळ उत्तर मतदार संघानंतर काँग्रेसला या मतदारसंघात विजयाच्या सर्वाधिक अपेक्षा आहेत.
याशिवाय, गोविंदपुरा हा मध्य प्रदेशातील आणखी एक महत्वाचा मतदारसंघ मानला जात आहे. याठिकाणी गेल्या ३० वर्षांपासून भाजपचे बाबूलाल गौर हे आमदार होते. यावेळी त्यांची सून कृष्णा गौर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, यावेळी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने येथील प्रचारात फारसा रस दाखवला नव्हता. तर दुसरीकडे काँग्रेसने कृष्णा गौर यांच्याविरोधात बाबूलाल गौर यांच्या जुन्या कार्यकर्त्याला उभे केले आहे. त्यामुळे गौर यांच्यासाठी ही लढाई काहीशी अवघड झाली आहे.
भोजपुर
भोजपुर हा मध्य प्रदेशातील आणखी एक प्रतिष्ठेचा मतदारसंघ. यावेळी भोजपुरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश पचौरी रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे ज्येष्ठ नेते सुंदरलाल पटवा यांचा भाचा सुरेंद्र पटवा यांचे आव्हान आहे. पचौरी हे एकेकाळी संजय गांधी यांच्या मर्जीतील नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना निवडणुकीत विजय मिळालेला नाही. परंतु भोजपुरमधून यावेळी त्यांना विजयाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
बुदनी
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान निवडणूक लढवत असलेला बुदनी मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बुदनी हे शिवराज सिंह यांचे जन्मगाव आहे. यावेळी शिवराज सिंह यांना काँग्रेसच्या अरूण यादव यांनी आव्हान दिले आहे. मात्र, पक्षांतर्गत वादामुळे त्यांच्या विजयाची वाट खडतर मानली जातेय.
होशंगबाद
होशंगबाद हा मध्य प्रदेशातील जुन्या मतदारसंघांपैकी एक मानला जातो. हा प्रदेश शेतीसाठी ओळखला जातो. फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेल्या शीख समुदाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाला. सरताज सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा समुदाय आतापर्यंत भाजपच्या पाठिशी उभा होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट नाकारल्यामुळे सरताज सिंह यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेतलाय. त्यांनी भाजपचे विधानसभा अध्यक्ष सीताशरण शर्मा यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. हे दोन्ही नेते मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. मात्र, स्थानिक लोकांच्या मते भाजपने सरताज सिंह यांना उमेदवारी नाकारून मोठी चूक केली आहे. त्यामुळे होशंगबाद जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागांपैकी दोन जागांवर भाजपचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे.
बैतूल
होशंगाबादहून बैतूलच्या दिशेने सरकरल्यानंतर भाजपने दावा केलेल्या विकासाचा अपूर्ण चेहरा समोर येतो. याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ ला लागून असलेल्या रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. हा रस्ता एकप्रकारे भाजपच्या विकासाच्या दाव्यातील फोलपणा सिद्ध करतो. या परिसरातील घोडाडोंगरी परिसरात भाजपची चांगलीच हवा आहे. मात्र, बैतूल जिल्हा मुख्यालयाच्या मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव जाणवत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने बैतूलमधील पाचही जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यावेळची हवा पाहता भाजपला यापैकी काही जागा गमवाव्या लागू शकतात.
याशिवाय, ग्वाल्हेर, चंबळ, बुंदेलखंड, बघेलखंड, माळवा येथील लोकांनी यावेळची परिस्थिती २०१३ सारखी नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. काँग्रेसला या निवडणुकीत नक्कीच फायदा होईल. मात्र, या सगळ्याचा मध्य प्रदेशच्या एकूण निकालांवर कितपत प्रभाव पडेल, याबद्दल अजूनही संभ्रमच आहे.