अजय शर्मा, झी मीडिया, भोपाळ : वर्षभरापूर्वी बुराडी हत्याकांडानं देशात खळबळ उडवून दिली होती. आताही असंच एक प्रकरण मध्यप्रदेशातील भोपाळमधून समोर येतंय. भोपाळनजिकच्या मंडिदीपमध्ये एका रहिवासी कॉलनीतल्या एका घरात चार जणांचे मृतदेह सापडलेत. तर घरातील कर्ता पुरुषाला पोलिसांनी अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केलंय. त्याची परिस्थिती गंभीर असल्याचं समजतंय. घरातील दृश्यं पाहून पोलिसांनाही धक्का बसला... प्राथमिकदृष्ट्या हे सामूहिक आत्महत्येचा प्रकरण असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्ड क्रमांक २३ मधल्या हिमांशु कॉलनीतील सी-५५ या घरात २५ वर्षीय सन्नू हा पत्नी पोर्णिमा, ११ वर्षांचा मेव्हणा, सासू आणि १२ दिवसांच्या आपल्या मुलीसोबत राहत होता. सन्नूची सासू काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातून आपल्या मुलीकडे आली होती. 



मंगळवारी २२ जानेवारी रोजी शेजारच्या नितीन चौहान यानं काही कामानिमित्त सन्नू याला बाहेरून आवाज दिला... परंतु, घरातून कुणाचंही प्रत्यूत्तर आलं नाही. बराच वेळ शेजाऱ्यांनी आवाज दिल्यानंतर घरात काहीतरी गडबड असल्याचं शेजाऱ्यांच्या लक्षात आलं... आणि त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. 


घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला... तेव्हा समोरचं दृश्य पाहून पोलिसही अवाक् झाले. घरात पोर्णिमा, १२ दिवसांची मुलगी, पोर्णिमाची आई आणि भाऊ मृत अवस्थेत सापडले. मात्र, सन्नू जिवंत असला तरी अत्यवस्थ होता. पोलिसांनी तत्काळ त्याला हॉस्पीटलमध्ये हलवलं. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सूसाईड नोट सापडली नाही.



एसपी मोनिका शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावलेल्या पुरुषाच्या अर्थात सन्नूच्या शरीरात विषारी पदार्थ सापडलेले नाहीत. मात्र, इतर मृतकांच्या तोंडातून आलेला फेस पाहता त्यांना विष दिल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केलीय. 


मिळालेल्या माहितीनुसार, सन्नू हा एका खाजगी कंपनीत काम करत होता. तो मूळचा छत्तीसडच्या दंतेवाडाचा रहिवासी आहे. भोपाळमध्ये तो भाड्याच्या घरात राहत होता. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर या गूढ मृत्यूचं कोड सुटेल, असं पोलिसांनी म्हटलंय.