काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज- ज्योतिरादित्य सिंधिया
काँग्रेसला वर्तमान काळात आत्मचिंतनाची गरज असल्याचे सिंधिया यांनी म्हटले आहे.
ग्वालियर : काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्याच पार्टीबद्दल केलेले विधान देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. काँग्रेसला वर्तमान काळात आत्मचिंतनाची गरज असल्याचे सिंधिया यांनी म्हटले आहे. वर्तमान काळात जे काही सुरु आहे त्याचा आढावा घेण्याची काँग्रेसला गरज आहे, जेणेकरुन काँग्रेस पुढे जाऊ शकेल असे ते म्हणाले. ते सध्या ग्वालियर-चंबलच्या दौऱ्यावर आहेत.
काँग्रेसची स्थिती बिकट असून हरियाणा आणि महाराष्ट्रात जिंकू शकत नसल्याचे काँग्रेस नेता सलमान खुर्शीद यांनी म्हटले होते. या पार्श्वभुमीवर ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. याला उत्तर देताना सिंधियांनी आत्मचिंतनाची गरज व्यक्त केली.
खुर्शीद यांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले, कोणत्याचे काय विधान आहे आणि का आहे ? हे त्याचे त्याला माहिती असेल. पण मला वाटतं की काँग्रेसने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केले. माझे काम तिकिट वाटपाचे होते. आता पुढचे काम स्थानिक संघटना बघत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसला महाराष्ट्रात नक्कीच यश मिळेल असेही ते म्हणाले.