ज्याच्या अंगावर लघुशंका केली त्याचा सन्मान; मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने धुतले आदिवासी तरुणाचे पाय
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) साधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील पीडित व्यक्तीला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी त्यांची भेट घेत सन्मान केला आणि मदतीचं आश्वासन दिलं.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील पीडित व्यक्तीला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी आपल्या निवासस्थानी आदिवासी दशमत रावत यांची भेट घेतली. त्यांना भोपाळला बोलावण्यात आलं होतं. येथे मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने त्यांचे पाय धुतले, टिळा लावला आणि शाल देत सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी आधीच खेद व्यक्त करत माफी मागितलेली आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित तरुणाला गणपतीची प्रतिमा दिली आहे. तसंच श्रीफळ आणि शालही दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी तरुणाला घरी काही समस्या तर नाही ना? असेल तर मला नक्की सांगा असं सांगितलं. पीडितने आपल कुबेरी बाजारात गाडी ओढणयाचं काम करतो अशी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुलं शाळेत जातात का? त्यांना शिष्यवृत्ती मिळते का? अशीही विचारणा केली.
शिवराज सिंह यांनी यावेळी घटना पाहिल्यानंतर मला फार दु:ख झालं आहे, मी तुमची माफी मागतो असं म्हटलं. माझ्यासाठी माझी जनताच देव आहे असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी दशमत यांना नाश्ताही दिला.
सिधी जिल्ह्यात काय झालं होतं?
मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं होतं. एका व्यक्तीने त्याच्यासमोर उभं राहून त्याच्या अंगावर लघुशंका केली होती. इतकंच नाही तर त्याचा व्हिडीओही रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रवेश शुक्ला याच्यावर कारवाई केली होती. आरोपीवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करा असा आदेश शिवराज सिंह चौहान यांनी दिला आहे. अशा प्रकारचं कृत्य सहन केलं जाऊ शकत नाही असं ते म्हणाले आहेत. आरोपीच्या घऱावरही बुल्डोझर चालवत कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
आरोपी भाजपा आमदाराचा सहकारी?
तपासात आरोपी भाजपाचा युवा नेता असल्याचं समोर आलं होतं. लघुशंका करणारा प्रवेश शुक्ला हा भाजपा आमदार केदार शुक्ला यांचा प्रतिनिधी असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपा आमदारांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. पण आपण त्याला ओळखत असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे.
ही जवळपास एक आठवड्यापूर्वीची घटना आहे. पण व्हिडीओ समोर आल्यानंतर ती उघडकीस आली आणि पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
राष्ट्रीय सुरक्षा कायदा काय आहे?
राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीला धोका असल्याच्या आऱोपाखाली ताब्यात घेतलं जाऊ शकतं. जर प्रशासनाला संबंधित व्यक्ती देशाच्या सुरक्षेला धोका ठरु शकतो असं वाटत असेल तर त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.