मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. त्यांनंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण या प्रक्रियेतील गोंधळ समोर येत आहेत. मालवा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला 24 हजार रुपयांचे कर्ज होते. पण प्रत्यक्षात मात्र त्याचे अवघ्या 13 रुपयांचे कर्ज माफ झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बैजनाथ निपानिया गावातील शेतकरी शिवलाल कटारिया यांच्यासोबत हा दुर्देवी प्रकार घडला. शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले. शिवलाल यांचे 23 हजार 815  रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे आपले सर्व कर्ज माफ होईल अशी त्यांना आशा होती. पण पंचायतीमधून आलेल्या यादीमध्ये प्रत्यक्षात 13 रुपयांचे कर्ज माफ झाले होते.


कर्जमाफीत घोटाळा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 'आम्ही ईमानदार शेतकरी आहोत. वेळेवर कर्ज चुकवतो', असे शेतकरी शिवलाल यांनी सांगितले. तर 'ज्या दिवशी कर्जमाफी झाली त्या तारखेला तुमच्यावर कोणतेही कर्ज नव्हते' असे कर्जमाफी प्रक्रीये दरम्यान कर्मचाऱ्याने सांगितले. पण कर्ज माफी दरम्यानची गडबड होत असल्याचे सरकारी यंत्रणेकडूनच मान्य करण्यात आले आहे.


कर्जमाफीमध्ये होणारी गडबड आता समोर येत असून यावर आवश्यक ती पाऊले उचलली जातील असे प्रभारी मंत्री ओमकार सिंह यांनी सांगितले. कर्जमाफीमध्ये काहीतरी घोटाळा झालाय असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्याकडे यासंदर्भात तक्रारही करण्यात आली आहे.


50 हजार कोटींची कर्जमाफी  



 कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. 15 जानेवारी पासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली.


राज्यात 5 फेब्रुवारी पर्यंत अर्ज भरले जाणार आहेत आणि 22 फेब्रुवारी पासून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. या योजने अंतर्गत 55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. एकूण 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.