पतीसोबत फिरायला गेलेल्या महिलेवर सामुहिक अत्याचार, आरोपींनी व्हिडिओ बनवला आणि...

आपल्या देशात कितीही कठोर नियम झाले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होताना दिसत नाही. देशात आजही महिला सुरक्षित नाहीत. अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. पतीबरोबर फिरायला गेलेल्या एका महिलेवर पाच आरोपींनी सामुहिक अत्याचार केला.
आपल्या देशात कितीही कठोर नियम झाले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होताना दिसत नाही. देशात आजही महिला सुरक्षित नाहीत. अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. पतीबरोबर फिरायला गेलेल्या एका महिलेवर पाच आरोपींनी सामुहिक अत्याचार (GangRape) केला. धक्कादायक म्हणजे अत्याचार करताना आरोपींना व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी दिली. मध्य प्रदेशमधली (Madhya Pradesh) ही घटना आहे. मध्य प्रदेशमधल्या अल्ट्रा सोलर प्लांट आणि प्रसिद्ध भैरव बाबा गडावर हे दाम्पत्य फिरायला गेलं होतं. यावेळी पाच आरोपींनी महिलेवर सामुहिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
मध्य प्रदेशमधल्या रिवा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या भैरव बाबा गडावर हे युवा दाम्पत्य फिरायला गेलं होतं. यावेळी तिथे आलेल्या पाच आरोपींनी दाम्पत्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पतीला दोरखंडाने बांधलं आणि त्याच्या समोरच पाच जणांनी आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला. आरोपींनी या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवला आणि पोलिसात तक्रार केली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. ही संतापजनक घटना सोमवारी घडली. पोलिसांनी मंगळवारी तक्रार नोंदवून घेत प्रकरणाचा तपास सुरु केला.
पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
भैरव बाबा गड हा परिसर पर्यटनाबरोबरच औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. यानिमित्ताने तिथे इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आला होता. यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह देशातील काही बडे उद्योगपती सहभागी झाले होते. त्यामुळे अत्याचार प्रकरणाचा तिथल्या कार्यक्रमावर परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडितांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. आतापर्यंत काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार पाच आरोपींनी सामुहिक अत्याचार केला. पोलीस अधिक्षक विवेक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आणखी काही जण होते का याचा तपास सुरु आहे.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. यात सर्व आरोपी दारु पार्टी करत असल्याचं दिसतंय. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने अंमलीपदार्थांची नशा केल्याचंही सांगितलं. नशेमुळे महिलेला पाहिल्यावर त्यांच्यातील वासना जागी झाली आणि महिलेवर बलात्कार केला. या घटनेविरुद्ध संताप व्यक्त केला जात असून आरोपींना कठोर कारवाईची मागणी कली जात आहे.