मुंबई : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या डबघाईला आल्या आहेत. काही कंपन्यांनी तर कामगारांना कामावरून काढून टाकलं आहे. एकीकडे उद्योग संकटात असताना मॅगीचं उत्पादन करणाऱ्या नेस्ले इंडियाची चांदी झाली आहे. कोरोना लॉकडाऊनचा मॅगीच्या उत्पादनावर आणि विक्रीवर कोणताही विपरित परिणाम झाला नाही, उलट मागच्या २ महिन्यांमध्ये मॅगीची रेकॉर्डब्रेक विक्री झाली आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी भूक भागवण्यासाठी मॅगीला पसंती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमचं सहयोगी चॅनल झी बिझनेसने दिलेल्या वृत्तानुसार, मॅगीने २०१५ सालाआधीचा विक्रीचा आपला विक्रम या दोन महिन्यात मोडून काढला आहे. २०१५ साली लेडचं प्रमाण जास्त असल्यामुळे सरकारने मॅगीवर बंदी घातली होती. २०१४ साली मॅगीचा एकूण खप २.५४ लाख मेट्रिक टन एवढा होता. पण एप्रिलपासून आत्तापर्यंत ३.६४ लाख मेट्रिक टन मॅगीची विक्री झाली आहे. 



२०१४ साली नेस्लेने मॅगीच्या विक्रीतून २,९६१ कोटी रुपये कमावले होते. तर या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्येच मॅगीमुळे कंपनीचं उत्पन्न ३,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. मॅगीच्या विक्रमी विक्रीमुळे नेस्लेलाही जबरदस्त फायदा झाला आहे. सध्याच्या घडीला इन्सटंट न्यूडल्सच्या बाजारात मॅगीची भागीदारी ८० टक्के एवढी आहे.