Mahakumbh 2025 : 'मेले मे बिछडे, मिल ही गये...' ही अशी वाक्य अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये ऐकली असतील, हे प्रसंग जीवंत करणारी दृश्यही पाहिली असतील. पण, प्रत्यक्षात अगदी अशीच घटना घडल्याचं कधी ऐकलं आहे का? नसेल ऐकलं किंवा पाहिलं, तर महाकुंभ मेळ्यात घडलेल्या या प्रसंगातून हासुद्धा अनुभव मिळेल. महाकुंभ मेळ्या एकाहून अनेक गोष्टी घडत असताना, कैक साधू लक्ष वेधतानाच एका घटनेनं मात्र अनेकांना हैराण केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडमधील एका कुटुंबाला तब्बल 27 वर्षांनंतर घरातून निघून गेलेली व्यक्ती सापडल्यानं या अध्यात्मिक मेळ्यात आशेचा किरणच दिसला आहे. गंगासागर यादव नामक ही व्यक्ती 27 वर्षांपूर्वी झारखंडमधील आपल्या घरातून निघून गेली. घर सोडताना त्यानं पत्नी आणि मुल असा संसार मागे सोडला आणि परत कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण, आता मात्र दोन दशकांहून अधिक काळ उलटल्यानंतर हीच व्यक्ती महाकुंभ मेळ्यात दिसल्याचं म्हटलं जात आहे. 


झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील एका कुटुंबातील सदस्यांनी 29 जानेवारी रोजी आपल्याच कुटुंबातील एक बेपत्ता व्यक्ती महाकुंभ मेळ्यात सापडल्याचा दावा केला आहे. सध्या या कथित व्यक्तीचं वय 65 वर्षे असून, ही व्यक्ती राजकुमार या नावानं अघोरी साधू म्हणून या मेळ्यात वावरत आहे. 


कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार 1998  मध्ये गंगासागर यादव अखेरचा पटना इथं दिसला आणि त्यानंतर त्याच्याशी काहीच संपर्क झाला नाही. दरम्यान, त्याची पत्नी धन्वादेवी हिनंच कुटुंबाचा गाडा पुढे नेत कमलेश, विमलेश या दोन्ही मुलांना लहानाचं मोठं केलं. 'आपण वर्षानुवर्षांमध्ये तो कधी परत येईल ही आशाच सोडली होती. पण, आमचे नातेवाईक महाकुंभमध्ये आले आणि इथे त्यांना गंगासागरसारखेच दिसणारे एक साधू दृष्टीस पडले आणि त्यांनी आम्हाला फोटो पाठवला', असं कुटुंबीयांनी सांगितलं. 


फोटो समोर येताच कुटुंबीयांनी तडक महाकुंभ मेळा गाठला आणि तिथं बाबा राजकुमार यांची भेट घेतली. पण, त्यांनी आपली पूर्वीची ओळख स्वीकारण्यास सपशेल नकार देत आपण वाराणासीतील साधू असल्याचं सांगितलं, असं गंगासागरच्या धाकट्य़ा भावानं, मुरली यादवनं सांगितलं. 


हेसुद्धा वाचा : नागा साधू होण्यासाठीची 'टांगतोड' प्रक्रिया खूपच भयंकर! लिंग निकामी केलं जातं का?


 


गंगासागरच्या कुटुंबीयांनी त्याच्या जन्मखुणा आणि शरीरावरील काही इतर खुणांचा संदर्भ देत हीच व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याचा दावा केला. त्याची पत्नी आणि मुलांनी कुंभ मेळ्यातील पोलिसांनाही याबाबतची माहिती घेत डीएनए चाचणीची मागणी केली. दरम्यान, कुंभमेळा संपेपर्यंत आपण प्रतीक्षा करणार असल्याचं म्हणत या चाचणीतून सकारात्मक उत्तर मिळाल्यास आपण कायदेशील लढाई लढणार अशी भूमिका स्पष्ट केली. तर, या चाचणीतून काहीच निष्पन्न न झाल्यास आपण साधूंची क्षमा मागू असंही स्पष्ट केलं. सध्या यादव कुटुंबातील काही सदस्य स्वगृही परतले असून काही सदस्य मात्र महाकुंभमध्येच राहून बाबा राजकुमार आणि त्यांच्यासोबतच्या साध्वीवर नजर ठेवून आहेत.