Mahakumbh Stampede : उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सध्या महाकुंभ मेळा सुरू असल्यामुळं हा भाग उपस्थितांनी दुमदुमला आहे. देशविदेशातील नागरिकांसह भारतातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविकांनी प्रयागराज गाठलेलं आहे. साधूसंतांची वर्णी असणाऱ्या या ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास मात्र अतिशय भयावह घडली. मौनी अमावस्येचं निमित्त साधत पवित्र गंगा स्नानासाठी प्रचंड गर्दी उसळली आणि प्रयागराज इथं भयंकर चेंगराचेंगरी होत एकच गोंधळ माजला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेंगराचेंगरी इतकी भीषण स्वरुपातील होती, की इथं अनेकांचाच घटनास्थळी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर घटनेची माहिती आणि महाकुंभसाठी झालेली एकंदर गर्दी पाहता घटनास्थळी तातडीनं रुग्णवाहिका दाखल होत यंत्रणांनीही इथं धाव घेतली. या संपूर्ण घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांच्याकडून घटनेचा आढावा घेतला. 




मौनी अमावस्येनिमित्त इथं येणारी गर्दी अनपेक्षित प्रमाणात वाढल्यामुळं प्रशासनानं अनेकांनाच प्रयागराज इथून माघारी पाठवलं. या संपूर्ण घटनेमुळं बुधवार 29 जानेवारी रोजी, मौनी अमावस्येनिमित्त होणारं पवित्र अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय महाकुंभमधील सर्व 13 आखाड्यांच्या वतीनं घेण्यात आला. 



पहाटेच्या वेळी अचानकच गर्दी वाढली आणि... 


मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभ मेळ्यामध्ये गंगेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी म्हणून अनेकांनीच संगमाच्या दिशेनं धाव घेतली. यादरम्यान पोल क्रमांक 90 ते 118 मध्ये एकच गोंधळ माजला तिथं यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. प्रथमदर्शींच्या माहितीनुसार बॅरिकेड उघडल्यानंतर एकाएकी लोकांचा लोंढा नियंत्रणाबाहेर गेला आणि इथं चेंगराचेंगरी झाली, आरडाओरडा, किंकाळ्या आणि भीतीच्या वातावरणात ही परिस्थिती आणखी जास्त चिघळली. 


गर्दीचा एकंदर आढावा घेत परिस्थितीचं गांभीर्य ओळखत अखेर आखाड्यांच्या वतीनं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आखाडा परिषदेचे महामंत्री हरि गिरी यांच्या माहितीनुसार अनिश्चित काळासाठी हे अमृत स्नान रद्द करत भाविकांच्या हितार्थ हा निर्णय घेण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर आता इथं बचावकार्याला वेग आला या दुर्घटनेत काही मृत्यू आणि शेकडो जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.