नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारला उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच बहुमत चाचणीच्यावेळी व्हिडिओ चित्रिकरण करायचे आहे. ही चाचणी संध्याकाळी ५ वाजपर्यंतच्या आत संपविण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हंगामी अध्यक्षच बहुमत चाचणी घेणार. गुप्त पद्धतीने मतदान होणार नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकशाही मूल्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे  जनतेला चांगले सरकार मिळणे हा मुलभूत अधिकार आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्याच (२७ नोव्हेंबर) बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.



 राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी झाली. त्यानंतर आज त्यांनी बहुमत चाचणी उद्याच घेण्याचे आदेश दिले आहेत.


निर्णय देताना काय म्हटले न्यायालयाने?


२७ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या आधीच बहुमत चाचणी घ्या. गुप्त मतदानाने नको, खुलं मतदान करा. विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रण करा, हंगामी अध्यक्ष नेमण्याचे आदेश देण्यात आले आहे. हंगामी अध्यक्षच बहुमत चाचणी करणार आहेत. उद्याच विधानसभा अधिवेशन बोलवा आणि आधी आमदारांचा शपथविधी होईल. शपथविधीनंतर विश्वासदर्शक मांडा. सर्वांनी घटनात्मक मूल्य पाळली पाहिजेत, असे सांगत विधिमंडळाच्या अधिकार क्षेत्रात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले.