Yogi Adityanath Death Threats: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. 10 दिवसात योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी धमकीत करण्यात आली आहे. जर राजीनामा दिला नाही तर त्यांचा बाबा सिद्दिकी करू असं धमकी देणाऱ्याने म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांना माहिती दिली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस कंट्रोल रूममध्ये शनिवारी 2 नोव्हेंबरला सायंकाळी धमकीचा मेसेज आला होता. या धमकीनंतर  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षा व्यवस्थेला अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई पोलिस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलिसांना माहिती देण्यात आली असून तेही यासंबंधी तपास करत आहेत. 


वाहतूक नियंत्रण कक्षाला अज्ञात क्रमांकावरून धमकीचा संदेश 


यात विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून हा संदेश आला. ज्यामध्ये आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न दिल्यास राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे त्यांची हत्या केली जाईल, असे म्हटले होते.


योगी प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार? 


आजपासून सगळ्याच राजकीय पक्षांच्या सभांना सुरूवात झाली आहे आणि त्यांनी आपापल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. भाजपच्या यादीत योगी आदित्यनाथ यांचे नाव आहे त्यामुळे ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन पोलीस सतर्क झाले आहेत. त्यांनी या धमकीच्या संदेशाची चौकशी सुरू केली आहे.


मुख्यमंत्री योगी यांना अनेकदा आल्या आहेत धमक्या 


या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. धमक्या देणाऱ्यांना यूपी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली आहे. कोणी 112 क्रमांकावर कॉल करून धमकी दिली तर कोणी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून. या सर्वांना उत्तर प्रदेश पोलिसांनी काही दिवसांतच अटक केली आहे. यावर्षी 23 एप्रिल रोजी एका व्यक्तीने 112 वर धमकीचा संदेश पाठवला होता, ज्यामध्ये गुन्हेगाराने लिहिले होते की, 'मी सीएम योगी यांना लवकरच ठार करीन.' या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या आणि आरोपीला लवकरच अटक करण्यात आली.