Weather Forecast Today: अवकाळीच्या सावटातून निघत नाही, तोच महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा सुरु झाला. एप्रिल, मे महिन्यापर्यंच अवकाळीनं झोडपून काढलेलं असतानाच आता राज्यातील तापमानानं चाळीशी ओलांडण्यास सुरुवात केल्यामुळं अनेक भागांमध्ये उष्णता जाणवू लागली आहे. किनारपट्टी भागांमध्येही आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यामुळं तिथं तापमानाचा आकडा जास्त असल्याचं भासत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा हवामानानं त्याचं रुप पालटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साधारण मागील 3 वर्षांपासून सातत्यानं प्रचंड उकाडा जाणवत असतानाच आता बुधवारी रात्रीपासूनच हवामानानं नवे रंग दाखवण्यास सुरुवात केली. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात 2 ते 3 अंशांनी घट झाली. तर, इथं महाराष्ट्रासह कोकणातही संध्याकाळच्या वेळचं तापमान कमी असल्याची बाब लक्षात आली. 


गेल्या 24 तासांमध्ये हरियाणा, राजस्थानात धुळीची वादळं आली. तर, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि मध्यप्रदेशात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. ओडिशा, सिक्कीम, तामिळनाडूमध्येही पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. 


पश्चिमी झंझावात सक्रीय झाल्यामुळं पुन्हा पाऊस? 


स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मू काश्मीर पट्ट्यावर बुधवारी एक पश्चिमी झंझावात सक्रीय झाला ज्याचा परिणाम देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये दिसणार आहे. हवमानानाच्या या परिस्थितीमुळं उत्तरेकडील बऱ्याच राज्यांमध्ये सोसाट्याचे वारे वाहणार असून, काही राज्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. 


पुढील 24 तासांसाठीच्या हवामानाबाबत सांगावं तर, पंजाब, हरियाणासोबत राजस्थानच्या बऱ्याच भागांना पाऊस झोडपणार आहे. काही ठिकाणी गारपीट तर,  कुठे धुळीचं वादळ येणार आहे. केरळ, तामिळनाजू, बिहार, गिलगिट, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांना पावसाचा तडाखा बसेल. तर, इथे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर वातावरण ढगाळ असेल. 


हेसुद्धा वाचा : 55 वर्षांहून जास्त वयाच्या वाहतूक पोलिसांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, पोलीस आयुक्तांना निर्देश


 


पुढच्या तीन दिवसांमध्ये देशाच्या उत्तरपूर्व राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, त्रिपुरामध्ये 18 ते 21 मे या दिवसांत मुसळधार पावसाचा ईशारा देत नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे. देशातील इतर राज्यांमध्येही पश्चिमी झंझावाताचे कमीजास्त परिणाम हवामानावर पाहता येणार आहेत. 


देशभरात सध्याच्या घडीला पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत असला तरीही हा मान्सून नाही, ही बाब लक्षात घेणं महत्त्वाचं. कारण, यंदाच्या वर्षी केरळातून मान्सून धीम्या गतीनं महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामुळं देशभरातही मान्सून सक्रीय होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ जाऊ शकतो.