नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या नावाने एक नवा वाद उफाळून आला आहे. राज्य सरकारच्या पुस्तकात गांधीजींच्या मृत्यूविषयी चुकीची माहिती छापून आल्याने हा वाद उफाळला आहे. यासंदर्भात राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी जोर धरत आहे. ओडिशा राज्यात हा प्रकार समोर आला असून मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर यावरून जोरदार टीका होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशा सरकारतर्फे महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. 'आमा बापुजी : एक झलक' असे या पुस्तिकेचे नाव असून ती प्रकाशनापूर्वीच वादात सापडली आहे. या पुस्तिकेमध्ये महात्मा गांधींचे जीवन कार्य, त्यांचा ओडिशाशी आलेला संबंध यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या मृत्यूसंदर्भात चुकीची माहिती देण्यात आली आहे. दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीचे आकस्मिक निधन झाल्याचे यात म्हटले आहे. गांधीजींचा मृत्यू एक 'अपघात' होता असा यात उल्लेख आहे.



काँग्रेसच्या नेत्यांकडून याविषयी संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरसिंह मिश्रा यांनी यासंदर्भात जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.