महिंद्राच्या वाहनांच्या किंमती वाढणार
वाहनांच्या किंमतीत एप्रिल महिन्यापासून ५ हजार रूपयांपासून ७३ हजार रूपयांपर्यंतची वाढ होणार आहे
मुंबई : महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीने प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किंमतीमध्ये एप्रिल महिन्यापासून ५ हजार रूपयांपासून ७३ हजार रूपयांपर्यंतची वाढ होणार असल्याचे सांगितले आहे. गुरूवारी कंपनीने याबाबत माहिती दिली. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतींमुळे पाऊल उचलले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या वाढीमुळे कंपनीकडून वाहनांच्या किंमतीत एप्रिल महिन्यापासून ०.५ टक्के ते २.७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
कंपनीचे अध्यक्ष राजन वढेरा यांनी यावर्षी मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय १ एप्रिलपासून नियामक गरजा पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. यामुळे खर्च वाढणार आहे. आम्ही खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले परंतु वाढत्या किंमती कमी करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी फ्रान्सची कार कंपनी रेनोने क्विडच्या किंमतीत एप्रिल महिन्यापासून ३ टक्क्यांच्या वाढीची घोषणा केली होती. गेल्या महिन्यात टाटा मोटर्सने कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ आणि बाहेरील आर्थिक स्थितीबाबत सांगत वाहनांच्या किंमतीत एप्रिलपासून २५ हजार रूपयांपर्यंत वाढ होणार असल्याची घोषणा केली होती.