नवी दिल्ली : देशसेवेसाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या प्रत्येक वीरापुढे देशातील सानथोर नतमस्तक होतात. कुटुंबासोबत इतरही अनेक गोष्टी देशासाठी मागे सोडत प्राण पणाला लावणाऱ्या अशाच वीरांचा सन्मान नुकताच सरकार दरबारी करण्यात आला. '... आणि देशसेवेसाठी त्यांनी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं', असं म्हणत जेव्हा निवेदकांनी सैनिकांच्या वीरगाथा सांगितल्या, तेव्हा पाहणाऱ्यांचंही मन हेलावून गेलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच एका वीरमरण आलेल्या मेजरच्या पत्नीनं आपलं दु:ख मनात कसं दाबून ठेवलं होतं हे पाहतानाही तिच्या धाडसाला नकळत सर्वांनी कडक सलाम ठोकला. 


21 राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवेत असणाऱ्या मेजर अनुज सूद यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या वीरपत्नीने हा पुरस्कार स्वीकारला. 


मागील वर्षी मेजर अनुज सूद यांना दहशतवाद्यांशी दोन हात करतना वीरमरण आलं होतं.


देशाप्रती प्राण पणाला लावणाऱ्या या योद्ध्याची वीरगाथा ज्यावेळी राष्ट्रपती भवनात सांगितली जात होती, तेव्हा त्यांची पत्नी आकृती यांच्या चेहऱ्यावर प्रचंड अभिमान दिसत होता. 


अभिमानासोबतच त्यांच्या मनातील दु:ख डोळ्यांतून व्यक्त होत होतं. त्यांनी कसेबसे अश्रू रोखून धरले होते. सूद यांच्या पत्नीची परिस्थितीपुढे ओढावलेली हतबलता सर्वांच्या मनाच कालवाकाव करुन गेली. 


ऐन तारुण्यात संसार सुरु झालेला असतानाच पतीची साथ अर्ध्यावर सुटणं, त्यातही देशासाठी त्यानं प्राण त्यागणं हे सारंकाही शब्दांत व्यक्त करणं कठीण. पण, मेजर सूद यांच्या पत्नीनं धीरानं परिस्थितीचा सामना करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. 


मागच्या वर्षी मेजर सूद यांच्या पार्थिवाकडे पाहून तुटल्या होत्या त्यांच्या पत्नी... 
मेजर सूद यांचं पार्थिव ज्यावेळी हरियाणातील पंचकुला येथे असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं तेव्हा एक फोटो समोर आला होता. त्यावेळी आकृती मेजर सूद यांच्या पार्थिवाच्या थडग्याला बिलगून होत्या. 


काही क्षण असेही दिसले जेव्हा त्या भावविरहित चेहऱ्यानं पार्थिवापाशी बसून होत्या. आयुष्भराच्या जोडीदारानं असं साथ सोडून निघून जाणं हा मोठा धक्का त्यांनाही हादरवून गेला होता. 



पतीनं साथ सोडली असली तरीही त्यानं देशासाठीच प्राण त्यागले आहेत याचा अभिमान आकृती सूद यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पण, या गौरवसोहळ्यात त्यांना पतीची अनुपस्थिती प्रचंड जाणवत होती हे त्यांच्या अगतिक चेहऱ्यावरून दिसत होतं. सारा देश हा क्षण पाहून भावूक झाला.