MakarSakranti News: मकरसंक्रांतीच्याच दिवशी दोन कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चायनीज मांजामुळं दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथील ही घटना आहे. तर, दुसरी घटना गुजरात जिल्ह्यातील महिसागर जिल्ह्यातील आहे. दोन्ही चिमुकल्यांचे वय सात वर्षे आणि चार वर्षे इतके आहे. दोन्हीही प्रकरणात ही मुलं त्यांच्या वडिलांसोबत बाइकवरुन जात असतानाच ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या प्रकरणात धार जिल्ह्यात चिमुरडा त्याच्या वडिलांसोबत बाईकवर जात होता. त्याचवेळी रस्त्यात चायनीज मांजामुळं त्याचा गळा चिरला गेला. त्याचवेळी त्याच्या वडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ही घटना हटवारा चौकातील आहे. 14 जानेवारी रोजी लोक मकरसंक्रातीच्या निमित्ताने एका मैदानात पंतग उडवत होते. तिथेच राहणारे विनोद चौहन एका कामासाठी घरातून बाहेर निघाले. त्यावेळी त्यांच्या सात वर्षांच्या मुलाने त्यांच्यासोबत येण्याचा हट्ट केला. विनोद यांनी त्यांच्या सात वर्षांच्या मुलालाही बाइकवर बसवले आणि घराबाहेर पडले. मात्र रस्त्यातचच अघटित घडले. 


विनोद बाइक चालवत असताना एका चौकात चायनीज मांजा लटकत होता. तो मांजा विनोद यांना दिसला नाही. कारण तो खूपच पातळ होता. मुलगा बाइकवर पुढे बसला होता. त्यामुळं या मांजामुळं मुलाचा गळा चिरला गेला. विनोद यांना हे लक्षात येताच त्यांनी बाइक थांबवली व रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या मुलाला रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 


या प्रकरणात शहर पोलीस अधीक्षक रवींद्र वास्केल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांकडे धार असलेला मांजा आहे त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. प्रशासनाने गेल्या दहा दिवसांपासून चीनी मांजाविरोधात अभियान चालण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, ही एक दुखःद घटना आहे. आम्ही पथक गठित केले असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. 


गुजरातमध्येही 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू 


दुसऱ्या एका घटनेत चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रविवार उत्तरायणच्या दिवशी चार वर्षांचा चिमुकला त्याच्या वडिलांसोबत बाइकवर जात होता. त्याचवेळी बोराडी गावानजीक चायजीन मांजामुळं त्याचा गळा चिरला गेला. त्याच्या वडिलांनी लगेचच त्याला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. एका वृत्तसंस्थेनुसार, उत्तरणायणच्या दिवशी पंतगाच्या मांज्यामुळं कमीत कमी 66 लोक जखमी झाले आहेत.