मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जर भाजपचा विजय झाला तर नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याची मागणी करण्यात आली आहे. विदर्भाचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी पंतप्रधानपदी नितीन गडकरींना बसवण्यासाची मागणी केली आहे. किशोर तिवारी यांनी म्हटलं की, 'तीन राज्यांमध्ये भाजपचा झालेला पराभव हा मोदींचा पराभव आहे. त्यामुळे पंतप्रधान बदलला पाहिजे. गडकरींना पंतप्रधान केलं पाहिजे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जर भाजप सत्तेत आली तर नितीन गडकरींना पंतप्रधान करा. राष्ट्रीय स्वंयसेवक संघांच्या वरिष्ठाकडे मी ही मागणी करत आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नितीन गडकरी यांच्यावर 2012 मध्ये खोटे आरोप लावून त्यांना भाजपच्या अध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे.' किशोर तिवारी हे महाराष्ट्राच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे.


किशोर तिवारी यांनी म्हटलं की, 'सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, 'चमचेगिरी करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित केलं जात आहे. भाजपला आगामी निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान बदलणं आवश्यक आहे. यासाठी नितीन गडकरी चांगला पर्याय आहे.'


शेतकरी नेते किशोर तिवारी.


किशोर तिवारी यांनी संघाच्या प्रमुखांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. 'सध्याचं नेतृत्व लोकशाहीपासून दूर गेलं आहे. सामान्य लोकांचा सल्ला घ्यायला ते तिरस्कार करतात. भाजपचे अनेक लोकं यामुळे नाराज आहेत. याचाच परिणामा 5 राज्यांच्या निवडणुकीवर झाला. जय-पराजय लोकशाहीचा भाग आहे. पण पक्षाचं नेतृत्व लोकशाहीने चालवलं गेलं पाहिजे. 2014 मध्ये नितीन गडकरी यांच्या अध्यक्षते भाजपला मोठं यश मिळालं होतं. भाजपचं नेतृत्व पुन्हा नितीन गडकरींच्या हातात दिलं पाहिजे.'