Chairperson of opposition block : यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणूक असल्याने आता राजकीय वर्तुळात बैठकांचं सत्र सुरू झालंय. अशातच आता विरोधी पक्षांच्या हालचालींना देखील वेग आलाय. विरोधकांच्या आज झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष करण्यात आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांना आघाडीच्या समन्वयकपदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती नाकारल्याची माहिती देखील समोर आली आहे. मला कोणत्याही पदाची इच्छा आणि अपेक्षा नाही, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या व्हर्चुअल बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर एकमत झालं, त्यामुळे आता काँग्रेसला येत्या लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. आत्तापर्यंत आघाडीच्या 4 बैठका झाल्या होत्या. पाटणा, बंगळूर, मुंबई आणि दिल्ली अशा चार बैठका होऊनही समन्वयक नियुक्ती झाली नव्हती. अशातच ममता बॅनर्जी यांनी मोठी खेळी खेळली.


दिल्लीतील बैठकीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचं नाव पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यावर चर्चा न झाल्याने आघाडीत बिघाडी तर झाली नाही ना? असा सवाल विचारला जात होता. त्याचवेळी नितीश कुमार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. पदाचा उल्लेखही न झाल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.


शरद पवार म्हणतात...


निवडणुकीपूर्वी कोणताही चेहरा लोकांसमोर द्यावा, असं आम्हाला वाटत नाही. एखाद्या नेत्याचा चेहरा समोर करावा आणि लोकांना मत मागावी, असं करावं आम्हाला वाटत नाहीये. आगामी लोकसभा निवडणूक झाल्यावर आणि आम्हाला बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चितच देशाला चांगला पर्याय आम्ही लोकांना देऊ, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. 


दरम्यान, विरोधकांच्या ऑनलाईन बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, नितीश कुमार, एमके स्टॅलिन, शरद पवार, डी राजा,ओमर अब्दुल्ला, राहुल गांधी, सीताराम येच्युरी, लालू यादव-तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, डी राजा, शरद पवार उपस्थित होते.