`मोदींना आवडेल ते स्वत:च्या हाताने बनवून देईन, पण ते..`; ममतांच्या ऑफरने राजकीय वाद
Mamata Banerjee Offer To Cook For PM Modi: ममता यांनी दिलेल्या ऑफरवरुन राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून सीपीआय (एम)ने वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
Mamata Banerjee Offer To Cook For PM Modi: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपण स्वत: जेवण बनवण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र ममता यांनी केलेल्या या विधानावरुन संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाने यामागे राजकारण असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर सीपीआयने (एम) ममतांची ही ऑफर म्हणजे दोघांमधील समझोता असल्याची शंका व्यक्त केली आहे.
त्यांना हवं ते खाऊ घालेन; ममतांची ऑफर
पंतप्रधान मोदींनी काही आठवड्यांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली होती. हिंदू सणासुदीच्या काळात तेजस्वी यादव यांनी मासे खाल्ल्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी ही टीका केली होती. यावर ममता यांनी सोमवारी एका जाहीर भाषणात "मी त्यांच्यासाठी (मोदींसाठी) स्वत:च्या हाताने जेवण करण्यास तयार आहे," असं म्हटलं. मात्र आपण तयार केलेलं जेवण मोदी खातील का अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. लोकांच्या अन्नसेवनाच्या सवयींमध्येही भाजपा हस्तक्षेप करत असल्याच्या मुद्द्यावरुन जाहीर सभेत टीका करताना ममतांनी मोदींसाठी जेवण बनवण्याची ऑफर दिली. मी त्यांच्यासाठी जेवण बनवण्यास तयार आहे. मात्र मी तयार केलेले पदार्थ खाण्यास मोदी तयार असतील का याबद्दल शंका वाटते, असंही त्यांनी मदू केलं. "मी माझ्या बालपणापासून जेवण बनवते. अनेकांनी माझ्या पाककलेचं कौतुक केलं आहे. मात्र मोदीजी मी बनवलेलं जेवण स्वीकारतील का? ते माझ्यावर विश्वास दाखवतील का? मोदींना आवडेल ते मी स्वत:च्या हाताने बनवून देईन, पण ते खातील का? त्यांना जे आवडतं ते बनवून खाऊ घालण्यास मी तयार आहे," असं ममता म्हणाल्या.
हा हक्क भाजपाला कोणी दिला?
"मला दोन्ही पद्धतीचे पदार्थ आवडतात. शाकाहारीमध्ये ढोकळ्यासारखे पदार्थही मला आवडतात. तर मांसाहारी पदार्थांमध्ये मला माछेर झोल (मशाचा रस्सा) आवडतो. हिंदूमधील प्रत्येक समाजाच्या परंपरा आणि खाण्याच्या सवयी वेगळ्या आहेत. लोकांच्या खाण्याच्या सवयींवर निर्बंध लावण्याचा हक्क भाजपाला कोणी दिला? यावरुनच भाजपाच्या नेतृत्वाला देशातील विविधता आणि सर्वसमावेशकतेची फार थोडी कल्पना असल्याचं दिसून येतं," असं ममता म्हणाल्या. मोदी हे स्वत: शाकाहारी असून त्यांच्यासाठी जेवण बनवण्याची ऑफर ममतांनी दिल्याने राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.
मोदींना मासे-भात खाऊ घालण्याचा कट
"ममता बॅनर्जींना मोदीजींना मासे आणि भात खाऊ घालायचा आहे," अशी टीका भाजपाचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल थाथंगता रॉय यांनी केली आहे. भाजपाचे नेते संकुब्त पांडा यांनी मुद्दा ममतांनी ही ऑफर दिली असल्याचं म्हटलं आहे. मोदी हे शाकाहारी असल्याने मुद्दाम ममता असं म्हणाल्याचं पांडा यांचं म्हणणं आहे. "हा ममतांचा राजकीय डाव आहे. त्यांना माहिती आहे की मोदीजी शाकाहारी आहेत. ते कधीच मासे किंवा मांसाहारी पदार्थ खाणार नाहीत," असं पांडा म्हणाले.
सीपीआयला वेगळीच शंका
सीपीआय (एम) चे नेते बिकाश भट्टाचार्य यांनी, "भाऊ-बहिण असल्याने ममतादिदी पंतप्रधानांसाठी जेवण बनवायला तयार झाल्या आहेत," असं म्हटलं आहे.