कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपनं तब्बल १८ जागा जिंकत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावला. त्यानंतर आता ममता बॅनर्जींनी आपलं सगळं लक्ष २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर केंद्रीत केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी प्रशांत किशोर यांची भेट घेतली. गुरुवारी या दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. या बैठकीत प्रशांत किशोर हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेससाठी काम करणार असल्याचं निश्चित करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला एवढा फटका का बसला? भाजपाच्या जागा २ वरून १८ कशा निवडून आल्या? भाजपाला किती टक्के मतं मिळाली? बंगालमधली व्होट बँक डाव्यांवरून भाजपाकडे कशी वळाली? याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येणार आहे.


नुकत्याच पार पडलेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी प्रशांत किशोर यांची मदत घेतली होती. त्यानंतर त्यांना या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळालं. त्यांनी १७५ पैकी दीडशे जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली.



कोण आहेत प्रशांत किशोर


प्रशांत किशोर हे निवडणूक प्रचाराची रणनीती आखणारे आणि मार्केटिंग आणि जाहिरातीतून अभियान चालवणारे एक्सर्ट आहेत. चाय पे चर्चा, 3डी रॅली, रन फॉर यूनिटी, मंथन या सगळ्या कल्पना त्यांच्याच आहेत. इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमेटी ते चालवतात. लीडरशिप, राजकीय रणनीति, मॅसेज कँपेन आणि भाषणांची ब्रँडींग ते करतात. 2014 मध्ये भाजपच्या विजयामागे त्यांचाच हात होता. 


2015 मध्ये त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत नीतीश कुमार आणि लालू यादव यांचं काम केलं. 2017 त्यांनी वायएसआर काँग्रेसचं काम केलं. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्यांनी सपासोबत काम केलं. पण त्यांना यश मिळालं नव्हतं.  


लोकसभा निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. ही भेट चांगलीच चर्चेत आली होती. लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना-भाजपमध्ये युती होण्यामागे यांचा देखील हात होता असं बोललं जातं.