नवी दिल्ली: हिंसक विचारसणीवर विश्वास असलेली व्यक्ती देशाचा कारभार सांभाळत असल्याने भारतात बलात्कार आणि हत्यांचे प्रमाण वाढल्याची जळजळीत टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते शनिवारी केरळमधील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, जगात भारताची ओळख ही बलात्काराची राजधानी अशी झाली आहे. भारतीयांना स्वत:च्या घरातील स्त्रियांची काळजी का घेता येत नाही, असा प्रश्न परदेशी लोकांना पडला आहे. भाजपचा एक आमदार बलात्कार प्रकरणातील आरोपी आहे आणि पंतप्रधान मोदी त्याच्याबद्दल चकार शब्दही काढत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंसेवर विश्वास असणारी व्यक्तीच आपल्या देशाचा कारभार चालवत आहे. त्यामुळेच देशात हिंसाचार आणि कायदा हातात घेण्याचे प्रकार वाढले आहेत. देशातील अनेक समूह सरकारला विरोध करत असल्याची माहिती आहे. त्यांचा विरोध हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. 


उत्तर प्रदेशाच्या उन्नाव येथील बलात्कार प्रकरण गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत आहे. या बलात्कार प्रकरणातील पीडितेचा शुक्रवारी रात्री दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात मृत्यू झाला होता. 



यासंदर्भात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही यांनीही अनेक सवाल उपस्थित केले. उन्नाव प्रकरणातील यापूर्वीच्या घडामोडी ध्यानात घेऊन सरकारने पीडितेला सुरक्षा का पुरवली नाही? याप्रकरणात एफआयआर नोंदवून घेण्यास नकार देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई का झाली नाही?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी विचारला.