Man Tries To Kill Wife: एका महिलेचा पती तिच्या छातीवर बसून गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील मुज्जफरनगर जिल्ह्यातील आहे. मात्र या व्हिडीओमधील महिलेसंदर्भातील धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या महिलेवर तिच्या दिराने बलात्कार केला. या दुष्कृत्याचा व्हिडीओ दिराने शूट केल्याचा या महिलेचा आरोप असून यासंदर्भात पतीकडे तक्रार करण्यासाठी गेली असता पतीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.


'आजपासून तू माझी वहिनी'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिलेवर 2 वेळा प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र दोन्ही वेळेस ती सुदैवाने बचावली. या महिलेने केलेल्या आरोपानुसार, 2 एप्रिल रोजी तिचा पती घरी नसताना तिच्या दिराने तिच्यावर बलात्कार केला. पती घरी आल्यानंतर घडलेल्या प्रकारासंदर्भात त्याला माहिती दिली. पत्नीबरोबर घडलेल्या लज्जास्पद कृत्यानंतर भावाला जाब विचारण्याऐवजी आणि माझी बाजू घेण्याऐवजी पतीने मला दिलेलं उत्तर ऐकून धक्का बसल्याचं या महिलेने सांगितलं आहे. 'यापुढे तू माझी पत्नी राहिलेली नाही. या क्षणापासून तू माझी वहिनी आहेस,' असं माझा पती मला म्हणाल्याचं पीडित महिलेचं म्हणणं आहे.


पीडितेला गळा आवळून मारण्याचा प्रयत्न


या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी पीडितेचा पती आणि दीर तिच्या रुममध्ये शिरले. ही पीडिता झोपलेली असतानाच तिचा पती तिच्या छातीवर बसला आणि तिच्या पदराने तिचा गळा आवळू लागला. हा सारा प्रकार या पीडितेचा दीर मोबाईलमध्ये शूट करत होता. कशीबशी ही महिला या हल्ल्यातून वाचली.


असा समोर आला सारा प्रकार


दोन्ही भावांची नजर चुकवून या महिलेने हा व्हिडीओ आपल्या फोनवर घेतला आणि तो सोशल मीडियावरुन शेअर केला. या व्हिडीओबरोबर लिहिलेल्या कॅप्शनमध्ये महिलेने नेमकं काय घडलं याची माहिती दिली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी कलम 376 (बलात्कार), 307 (हत्येचा प्रयत्न), आयपीसी 328 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खटवली येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे.


दोन्ही आरोपी फरार


दोन्ही आरोपी फरार असून पोलीस या प्रकरणामध्ये दोघांचाही शोध घेत आहेत. पोलीस निरिक्षक सत्यनारायण प्रजापती यांनी पोलीस आरोपींच्या मागावर असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.